रकुल प्रीत सिंहची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, मीडिया ट्रायलमध्ये नाव आल्याने निर्णय
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास चालू असताना त्यात अमली पदार्थ सेवन आणि ते बाळगल्याप्रकरणी आपलं नाव आल्यानंतर रकुलने दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स ब्युरोने अटक केली. त्यानंतर रियाने या विभागाला 20 पानी कबुलीजबाब आल्याच्या बातम्या आल्या. या 20 पानी कबुली जबाबात जवळपास 25 कलाकारांची नावं तिने घेतल्याच्या बातम्या आल्या. आणि या नावांत दोन मोठी नावं असल्याचंही बोललं गेलं. त्यात मुख्य दोन नावं होती सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह.
मीडियाने या दोन्ही नावांना यथेच्छ प्रसिद्धी दिली. विशेषत: काही हिंदी वृत्त वाहिन्यांनी आपल्यालाच कशी बातमी मिळाली आहे असं सांगत ही दोन नावं घेतली. त्यानंतर मात्र, मोठा गहजब उडाला. कालांतराने सरकारी अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही नावं आमच्याकडे आली नसल्याचं सांगितलं. रियाने कुणाचीही नाव घेतलेली नाहीत असंही स्पष्टीकरण देण्यात आलं. हा सगळा मामला चालू असताना रकुल प्रीत सिंगने मात्र दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास चालू असताना त्यात अमली पदार्थ सेवन आणि ते बाळगल्याप्रकरणी आपलं नाव आल्यानंतर रकुलने दिल्ली न्यायालयात धाव घेतल्याचं कळतं. माध्यमांकडून केली जाणारी ही ट्रायल हे माहिती आणि प्रसारणात असलेल्या नियमांचा भंग असल्याचं तिचे वकिल सांगतात. कोर्टाने रकुलचं हे म्हणणं प्रसारभारती आणि न्यूज ब्रॉडकास्टर्सकडे पाठवलं आहे. आपला काहीही संबंध नसताना कोणेतही पुरावे नसताना माध्यमांमधून ही नावं येत असताना आपली नाहक बदनामी होत असल्याचंही त्यात म्हटल्याचं कळतं.
संबंधित बातम्या :