Pune Viral Video : कथित नशेतील तरुणींच्या व्हिडीओने 'पिट्याभाई' अडचणीत येणार? महिला आयोगाकडे तक्रार दाखल
Pune Viral Video : पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत असलेल्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अभिनेता रमेश परदेशी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Pune Viral Video : पुण्यातील वेताळ टेकडीवर कथित अमली पदार्थाच्या नशेत असलेल्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल (Pune Viral Video) केल्याप्रकरणी अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) अडचणीत येण्याची शक्यता आहे. नशेत असलेल्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल करताना त्याने मुलींचा चेहरा ब्लर केला नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली. विशेष म्हणजे या व्हिडीओत रमेश परदेशी यांनी या व्हिडीओत या तरुणी अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याचा दावा केला होता. मात्र, तक्रारदार नेहा पुरव यांनी पोलिसांच्या हवाल्याने या तरुणी अमली पदार्थाच्या आहारी नसल्याचे स्पष्ट केले.
रविवारी, अभिनेते रमेश परदेशी यांनी वेताळ टेकडीवरील व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता. या व्हिडीओत दोन तरुणी नशेच्या आहारी गेल्याचे दिसत होते. एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे तर दुसऱ्या मुलीने अंमली पदार्थ घेतल्याने नशेत बडबड करत असल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडीओ पोस्ट करत रमेश परदेशी यांनी म्हटले की, वेताळ टेकडीवर आम्ही मॉर्निंग वॉकला आलो होतो. तर इथं महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या दोन तरुणी बियर, दारु आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. या तरुणींना आम्ही इथं सेफ जागी घेऊन आलो. हे यासाठी सांगतोय कारण पुण्यात दोन दिवसांपूर्वी 4 हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं आहे.
रमेश परदेशींविरोधात तक्रार दाखल
मुंबईतील पत्रकार नेहा पुरव यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओवर संताप व्यक्त केला. नेहा पुरव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, पुण्यात दोन मुली नशेच्या अमलाखाली कथित संस्कृती रक्षकांना आढळून आल्या. सगळ्यात आधी त्या मुलींनी जे केले ते अत्यंत चूकच आहे. त्या बद्दल त्यांना माफ करताच येणार नाही. पण या मुलींचे वय आणि त्यांची पुढील करिअर, पुढील आयुष्य बघता हा व्हीडिओ व्हायरल करणे किती योग्य होते? त्यांचे चेहरे न दाखवता स्वतःच्या समाजसेवेचा डांगोरा पिटता आला नसता का? असा सवाल त्यांनी केला.
मुलींनी ड्रग्ज घेतले नव्हते....
नेहा पुरव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी या प्रकारानंतर पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशन मधुन पत्रकार म्हणून माहिती घेतली. तेव्हा या मुली बिअर प्यायला होत्या आणि पोटात अन्न नसल्याने त्यांना नशा आल्याचे पोलिसानी सांगितले. या मुलींनी ड्रग्ज घेतले नव्हते, अशी माहिती पुरव यांनी दिली. या प्रकारानंतर नेहा पुरव यांनी राज्य महिला आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली. महिला आयोगाने ही तक्रार दाखल केली असल्याचे नेहा पुरव यांनी म्हटले.