(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prasad Oak : अन् मुख्यमंत्री दीड तासात माझ्या घरी पोहोचले; प्रसाद ओकने सांगितला 'वास्तुशांती'च्या भेटीचा किस्सा
Prasad Oak : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता प्रसाद ओक याच्या घरी दिलेल्या भेटीचा किस्सा नुकताच त्याने सांगितला आहे.
Prasad Oak : अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा लवकरच पुन्हा एकदा 'धर्मवीर-2' (Dharmaveer-2) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील त्याच्या आनंद दिघेंच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलीत. प्रसादच्या या भूमिकेचं सर्व स्तरातून अगदी भरभरुन कौतुक करण्यात आलं. पण त्यानंतर प्रसादवर काही वैयक्तिक गोष्टींमुळे टीकाही होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसादच्या घरी भेट दिल्यानंतर अनेक गोष्टींची चर्चा रंगू लागली होती.
काही महिन्यांपूर्वी प्रसादने मुंबईत त्याच्या हक्काचं घर घेतलं. त्यावेळी हे घर त्याला शासकीय कोट्यातून, मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याची टीका होऊ लागली होती. त्यावर प्रसादने प्रतिक्रिया देत, हे मी माझ्या कष्टातून उभं केलेलं घर असल्याचं म्हटलं. तसेच वास्तुशांतीला मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या घरी दिलेल्या भेटीचा किस्सा देखील त्याने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे.
'अन् ते माझ्या घरी आले...'
प्रसादने नुकतीच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला आहे. त्याने म्हटलं की, 'माझ्या घराच्या वास्तुशांतीच्या आदल्या दिवशी आमच्या सेटवर मुख्यमंत्र्यांचे पीए आले होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, उद्या वास्तुशांत आहे, येतील का साहेब? त्यावर ते म्हणाले की, तुमच्या घराची वास्तुशांत आहे, नव्या घराची आहे, का नाही येणार, ते येतील. मी म्हटलं, बरं साहेब आले तर मला आवडेल. त्या दिवशी साहेब रायगडमध्ये सभा घेत होते. माझा मुलगा न्यूज चॅनलवर लाईव्ह त्यांची सभा बघत होता. तो मला म्हणाला की, बाबा रात्रीचे 9.30 वाजलेत ते रायगडात आहे, आता कसे येतील? मी म्हटलं, ठीक आहे, त्यांचे पीए म्हणाले की, साहेब म्हटलेत मी येणार. तो सभा बघत होता, 10 वाजता त्यांची सभा संपली. रात्री 11 वाजता माणूस माझ्या घरी टच होते.'
पुढे प्रसादने म्हटलं की, 'मी काही त्यांचा हुजऱ्या वैगरे नाही. त्या माणासाचा खरा मोठेपणा सांगतोय. घरी आल्यावर त्यांनी मला विचारलं की, प्रसादजी जेवण किती लोकांचं आहे? मी विचारलं म्हणजे साहेब? त्यावर ते म्हणाले की,आपला सगळा स्टाफ, माझे सिक्युरिटी, पीए एकूण 17 ते 18 जणं आहेत. मी म्हटलं, साहेब 25 ते 30 जणांचं जेवण आहे. त्यांनी स्वत: बद्दल नाही विचारलं, त्यांचा सगळा स्टाफ, सिक्युरिटी, पोलीस यांच्याविषयी विचारलं.'