Paresh Rawal On Marathi Theatre: परेश रावल मराठी नाटकांबद्दल भरभरुन बोलले, मराठीवाले गुजरातीपेक्षा सरस, संगीत देवबाभळी पाहून भारावले
Paresh Rawal On Marathi Theatre: परेश रावल यांनी मुलाखतीत बोलताना मराठी रंगभूमी, कलाकार आणि लेखकांचं भरभरून कौतुक केलं आहे.

Paresh Rawal On Marathi Theatre: विनोदी म्हणा, संवेदनशील म्हणा किंवा सिनेमातला खुंखार विलन म्हणा, कोणतीही भूमिका असो, ती अत्यंत चोखपणे निभावणारे दिग्गज अभिनेते परेश रावल सध्या त्यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्याच मुलाखतीत बोलताना परेश रावल (Paresh Rawal) यांनी मराठी रंगभूमी आणि मराठी सिनेसृष्टीबाबत वक्तव्य केलं आहे. सध्या परेश रावल यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
परेश रावल यांनी मुलाखतीत बोलताना मराठी रंगभूमी (Marathi Theatre), कलाकार (Marathi Actors) आणि लेखकांचं (Marathi Writer) भरभरून कौतुक केलं आहे. विशेषतः परेश रावल यांनी मराठी नाटक 'संगीत देवबाभळी'चं भरभरून कौतुक केलं आहे. 'देवबाभळी' (Sangeet Devbabhali) या नाटकानं त्यांच्या मनावक अत्यंत खोल प्रभाव टाकला. तसेच, या नाटकाचा विषय, लेखन आणि कलाकारांच्या अभिनयाचीही अगदी प्रशंसा केली. 'देवबाभळी'सारखं नाटक केवळ मनोरंजन करत नाही, तर समाजातील खोल प्रश्नांवर विचार करायला भाग पाडतं, असंही परेश रावल म्हणाले आहेत.
परेश रावल नेमकं काय म्हणाले?
द लल्लनटापला दिलेल्या मुलाखतीत बोलताना परेश रावल म्हणाले की, "मराठी नाटकं खूप पाहायचो आम्ही. अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, श्रीराम लागू यांची नाटकं आम्ही पाहायचो. मराठीत नवीन नाटकं यायची ती आम्ही पाहायचोच. आम्ही नशिबवान होतो की, मराठीत इतकी चांगली नाटकं होती. आजही ते चांगलेच करतात. किती शिकायला मिळतं त्यांच्याकडून. मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी दोन पावलं पुढं आहे, कारण त्यांच्याकडे सशक्त असे लेखक आहेत. खूप उत्कृष्ट, पुढारलेले लेखक आहेत हे. कधी संधी मिळाली तर लेखक प्राजक्त देशमुखचं नाटक आहे, देवबाभळी, नक्की बघा. संगीत नाटक आहे."
"गोष्ट काय आहे तर एक संत तुकारामांची पत्नी आहे, एक विठ्ठलाची पत्नी आहे. गर्भवती असताना तुकोबांना शोधत आवली भटकत होती, तेव्हा तिच्या पायात देवबाभळीचा काटा घुसला आणि तिची शुद्ध हरपली. तिच्या पायातला काटा काढायला साक्षात विठ्ठल अवतरला अशी एक कथा सांगितली जाते. पायातला काटा काढल्यानंतर काय घडलं असेल?, त्या जखमेचं निमित्त करून विठ्ठलानं रखुमाईला आवलीची काळजी घ्यायला पाठवलं आहे का? विठ्ठल-रखुमाई, तुकोबा-आवली, आवली-विठ्ठल आणि आवली-रखुमाई यांच्यातील द्वंद्व काय आहे? दोन बायका एकत्र आल्या की, काय घडतं? हे या नाटकात आहे. लाईव्ह संगीत आहे, गाणी आहेत... त्यांना प्रेक्षकांना डेमो द्यावा लागतो की, हे आम्ही रेकॉर्ड केलेलं नाहीये. आम्ही तुमच्यासमोर गातो हे...", असं परेश रावल म्हणाले.
"आजच्या काळात जिथे केवळ चमक-धमक पाहिली जाते, तिथे 'देवबाभळी'सारखे नाटक वास्तवाशी आपली नाळ जोडून ठेवते. प्राजक्त देशमुख याचे उत्तम लिखाण आणि या नाटकातील संगीत हे संगीत देवबाभळी या नाटकाचा आत्मा आहे. अशी नाटकं आजही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पाहतात आणि पसंत करतात हे मराठी रंगभूमीचं मोठं यश आहे.", असंही परेश रावल म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Rapper Vedan Arrested: मोठी बातमी! प्रसिद्ध रॅपरला अटक; फ्लॅटमधून गांजा अन् बिबट्याचे दात सापडले























