सस्पेन्स, ड्रामा, थ्रील काय म्हणाल ते...! नोव्हेंबर महिन्यात ओटीटीवर धमाकेदार सिरीजचा तडका, ‘द फॅमिली मॅन 3' सह आणखी काय?
OTT Entertainment in November: या चार बहुप्रतीक्षित सीरिजसह नोव्हेंबर महिना ओटीटीप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने “बिंज-वॉचिंग फेस्टिव्हल” ठरणार आहे.

OTT Entertainment: ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे आज मनोरंजन आपल्याला अगदी एका क्लिकच्या अंतरावर आलं आहे. घरबसल्या जगभरातील चित्रपट, सीरिज आणि डॉक्युमेंट्रीज पाहता येत असल्याने प्रेक्षक दर महिन्याला नव्या कंटेंटची आतुरतेने वाट पाहत असतात. या वेळेस नोव्हेंबर महिनाही ओटीटीप्रेमींसाठी विशेष ठरणार आहे. या महिन्यात अनेक धमाकेदार चित्रपट बहुचर्चित सीरिजचे नवीन सीझन प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा हा महिना थ्रिल, ड्रामा आणि सस्पेन्सचा असणार आहे. (OTT release in November)
द फॅमिली मॅन सीझन 3
तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनोज बाजपेयी पुन्हा एकदा ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांसमोर येत आहेत. श्रीकांत तिवारी या वेळी आणखी आव्हानात्मक मिशनवर असणार आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि गुप्तचर आयुष्याचा तोल सांभाळत, या सीझनमध्ये कथा अधिक रंजक व थरारक बनणार आहे. ही लोकप्रिय सीरिज प्राइम व्हिडीओवर 21 नोव्हेंबरपासून पाहता येणार आहे. नुकतीच प्राईम व्हिडिओने फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सिझनची घोषणा केली.त्यामुळे चाहते या सिझनची आतुरतेने वाट पाहतायत.
दिल्ली क्राईम सीझन 3
डीसीपी वर्तिका चतुर्वेदी परत आली आहे! शेफाली शाह यांच्या दमदार अभिनयासह ‘दिल्ली क्राईम’चा तिसरा सीझन या वेळेस मानव तस्करीच्या काळ्या जगावर प्रकाश टाकणार आहे. पहिल्या सीझनने निर्भया प्रकरणाची झळक दाखवली होती, तर दुसऱ्या सीझनने ‘कच्छा-बनियान गॅंग’चा पर्दाफाश केला होता. या वेळी गुन्हेगारी आणि तपासाची लढाई आणखी तीव्र होणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर 13 नोव्हेंबरपासून स्ट्रीम होईल.
महाराणी सीझन 4
हुमा कुरेशी पुन्हा एकदा राणी भारतीच्या शक्तिशाली भूमिकेत परत येत आहे. *‘महाराणी’*च्या चौथ्या सीझनमध्ये बिहारच्या राजकारणातून पुढे जात ती राष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडताना दिसेल. या सीरिजने आतापर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकली असून, नवा सीझनही राजकीय ड्रामाने भरलेला असणार आहे. सोनी लिव्हवर 7 नोव्हेंबरपासून हा सीझन उपलब्ध होईल.
स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5
नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक लोकप्रिय सीरिज ‘स्ट्रेंजर थिंग्स’ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, चाहत्यांमध्ये एकाच वेळी उत्सुकता आणि भावूकता आहे. हा सीझन तीन भागांमध्ये रिलीज होणार असून, पहिला भाग २६ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर दाखल होईल. रहस्य, मैत्री आणि भयाचा हा शेवटचा प्रवास प्रेक्षकांना भावनिक आणि रोमांचक अनुभव देईल. या चार बहुप्रतीक्षित सीरिजसह नोव्हेंबर महिना ओटीटीप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने “बिंज-वॉचिंग फेस्टिव्हल” ठरणार आहे. मनोरंजन, सस्पेन्स आणि जबरदस्त अभिनयाची मेजवानी घरबसल्या घेण्यासाठी तयार राहा!


















