(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jaga Char Divas : नायक, नायिका ठरली नाही पण चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचं रेकॉर्डींग पूर्ण, 'जगा चार दिवस' चित्रपटाचा पार पडला मुहूर्त
Jaga Char Divas : आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी जगण्याचा सकारात्मक मंत्र देणारा 'जगा चार दिवस' हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : 'जगा चार दिवस' हा नवाकोरा सिनेमा (Marathi Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील पहिल्या गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण करत सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला आहे. 'मी तुला पाहिले, तू मला पहिले...' या गाण्याचे रेकॅार्डिंग मुंबईतील अंधेरी येथील स्पेस म्युझिक स्टुडिओमध्ये पार पडले. हे गाणं गायक स्वप्नील बांदोडकर (Swapnil Bandodkar) आणि गायिका नेहा राजपाल (Neha Rajpal) यांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आले आहे. यावेळी परभणीचे माजी खासदार अॅड. तुकाराम रेंगेपाटील, निर्माते मुकूंद महाले, सहनिर्माते डॅा. शांताराम दादा सोनावणे, राहुल सोनावणे, दिग्दर्शक सरकार आर. पी., अभिनेते गुरू आनंद तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
आज मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. मराठीची पताका सातासमुद्रापार आयोजित केल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये फडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिथल्या मानाच्या पुरस्कारांवरही मराठी चित्रपट नाव कोरण्यात यशस्वी होत आहेत. विषय आणि आशयाची अचूक सांगड घालत येणारे चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी जगण्याचा सकारात्मक मंत्र देणारा 'जगा चार दिवस' हा आगामी मराठी चित्रपटही याच पठडीतील आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच त्याच्या गाण्याच्या रेकॉर्डींगने पार पडला.
स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांच्या आवाजात संगीतबद्ध
जागृती एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या 'जगा चार दिवस'चे निर्माते मुकूंद महाले आणि जागृती राहुल मोरे आहेत. डॅा. शांताराम दादा सोनावणे आणि राहुल सोनावणे यांचे देवा चलचित्र आणि मयुरेश फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंट या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. गीतकार डॅा. श्रीकृष्ण राऊत यांनी 'मी तुला पाहिले, तू मला पहिले...' हे गाणं लिहिलं आहे. तसेच संगीतकार दिनेश अर्जुना यांनी स्वप्नील बांदोडकर आणि डॅा. नेहा राजपाल यांच्या आवाजात हे गाणं संगीतबद्ध केलंय. या चित्रपटाच्या नायक-नायिकेच्या मनातील भावना व्यक्त करणारं हे अर्थपूर्ण रोमँटिक गाणं आहे.
चित्रपटातील कलाकरांच्या निवडीची प्रक्रिया सुरु
सध्या या चित्रपटातील कलाकरांच्या निवडीची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.सस्पेन्स, हॅारर, कॅामेडी, फॅमिली आणि एन्टरटेनर असलेल्या 'जगा चार दिवस'चे दिग्दर्शन सरकार आर. पी. यांनी केलं आहे. तसेच या चित्रपटाची कथा देखील त्यांनीच लिहिली आहे.
प्रसंगानुरूप हे गाणं पटकथेत गुंफण्यात आलं आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर लगेचच चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवादलेखन मुकुंद महाले यांनी केलं आहे. गीतकार डॅा. श्रीकृष्ण राऊत यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार दिनेश अर्जुना यांनी संगीत साज चढवला आहे. छायांकनाची जबाबदारी डिओपी एच. डी. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवम गौड या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.