Bollywood: रोल कापल्याने इतका खचला की जीव द्यायला निघाला, आज शाहरुख सलमानसोबत घेतलं जातं या सुपरस्टारचं नाव
जगण्यासाठी त्याने अनेक कामं केली चौकीदार म्हणून काम, बाजारात कोथिंबीर विक्री, छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या.

Bollywood: बॉलिवूडमध्ये चमकणाऱ्या स्टार्सच्या आयुष्यामागे अनेकदा संघर्ष, वेदना आणि अपयशाची मोठी कहाणी दडलेली असते. आज ज्या अभिनेत्याबद्दल आपण बोलणार आहोत, तोही अशाच प्रवासातून पुढे आला आहे. त्याची फॅन फॉलोइंग आज शाहरुख खान, सलमान खानपेक्षाही कमी नाही, पण एक काळ असा होता की रोल कट झाल्यावर तो इतका खचून गेला होता की आत्महत्येचा विचारही त्याच्या मनात आला होता. हा अभिनेता म्हणजे आपल्याला ‘जब तक तोड़ेगा नहीं, तब तक छोड़ेगा नहीं’ या दमदार डायलॉगची थेट आठवण करून देणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी.
नवाजुद्दीन सिद्दीकी आठ भावंडांमध्ये मोठा
19 मे 1974रोजी यूपीतील बुढ़ाणा गावात एका जमीनदार मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकींचं बालपण उत्तराखंडात गेलं. आठ भावंडांमध्ये ते सर्वांत मोठे. शिक्षणातही तो कमी नव्हता; हरिद्वारच्या गुरुकुल कांगडी विद्यापीठातून त्यांनी केमिस्ट्रीमध्ये बी.एस्सी. पदवी घेतली.
अभिनयाशी नातं कसं जुळलं?
अभिनेता होण्यापूर्वी नवाजुद्दीन वडोदऱ्यात एका कंपनीत केमिस्ट म्हणून काम करत होता. पण त्याला त्या कामात समाधान मिळत नव्हतं. काही वर्षांनी ते दिल्लीला नवीन नोकरीच्या शोधात गेला आणि तिथे एका नाटक पाहिलं आणि त्यांचं आयुष्य बदलून गेलं. त्या एका प्लेनं त्यांना अभिनयाची ओढ लागली आणि त्यांनी ठरवलं "मलाही हेच करायचं!"
12 वर्षांचा संघर्ष
मुंबईत आल्यानंतर खरी झुंज सुरू झाली. ‘सरफरोश’ मध्ये छोटासा रोल, ‘शूल’ आणि ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ मध्ये क्षणभर दिसणारे रोल पण नवाज थांबला नाही. जगण्यासाठी त्याने अनेक कामं केली चौकीदार म्हणून काम, बाजारात कोथिंबीर विक्री, छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. पण अभिनय सोडला नाही. स्ट्रगलच्या काळात ते अभिनयाचे कोचही होते. ‘अभय’ चित्रपटात त्याने कमल हसन यांना हिंदी डायलॉग शिकवले. इतकंच नव्हे, रणवीर सिंहला ‘बँड बाजा बारात’साठीही त्याने ट्रेनिंग दिलं.
खऱ्या स्टारडमची सुरुवात
अनेक चित्रपटांत काम करूनही नवाजुद्दीन सिद्दीकीला खरी ओळख मिळाली ‘गँग्स ऑफ वासेपूर 2’ मधून. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान या तिन्ही सुपरस्टार्ससोबत नवाजने केलं आणि प्रत्येक भूमिकेनं त्याची ओळख अधिक मजबूत केली.
आज नवाजुद्दीन सिद्दीकी नाव म्हणजे मेहनत, जिद्द आणि कठोर संघर्षाचं जिवंत उदाहरण. पडद्यावर दिसणाऱ्या त्याच्या प्रचंड ताकदीच्या अभिनयामागे किती वेदना, नकार आणि अश्रू दडले आहेत जी त्याच्या प्रवासाची कथा सांगते.






















