स्टुडिओत अंधार करून सावनीने गायलं गाणं, राष्ट्रीय पुरस्कार विजेते रान पेटलं.. गाणं असं आलं आकाराला
सावनीला बार्डो सिनेमात गायिलेल्या रान पेटलं.. या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याबद्दल बोलताना ती म्हणाली, हे गाणं खूप इंटेन्स होतं. त्यासाठी ते गाणं समजून घेणं आवश्यक होतं. हे गाणं आम्ही रेकॉर्ड केलं तेही साध्या छोट्या स्टुडिओमध्ये.
मुंबई : सोमवारी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. बार्डो, खिसा, आनंदी गोपाळ, त्रिज्या या चित्रपटांनी आपली मोहोर उमटवली. त्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला तो बार्डो. या चित्रपटासाठी गायिका सावनी रविंद्रला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. रान पेटलं.. या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठीचा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर एबीपी माझाने तिच्याशी संवाद साधला. यावेळी ही बातमी कळल्यानंतर उडालेला गोंधळ तिने खास माझासोबत शेअर केला.
सावनीशी या पुरस्काराबद्दल बोलताना ती म्हणाली, खंरतर सोमवारी मी एका चॅनलसाठी ज्युरी म्हणून काम करते आहे त्याची तालीम होती. ती करून मी दुपारी घरी आले. थोडा आराम करण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण गायिका आनंदी जोशी आम्ही घरी आलो. आणि ती मला एक गाणं ऐकवत होती. म्हणून मी माझा फोन सायलेंट करून ठेवला. शिवाय नेटही बंद केलं. गाणं ऐकून झाल्यावर मी माझा फोन सुरू केला तेव्हा धडाधड अभिनंदनाचे मेसेज येऊ लागले. पहिल्यांदा मला इतके का अभिनंदनाचे मेसेज येतायत हेच मला कळेना. कारण, त्याापैकी कुणीही कारण यात लिहिलं नव्हतं. पण नंतर मला माझ्या नवऱ्याचा फोन आला आणि त्याने माझ्या या गाण्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळवल्याचं सांगितलं. खरंतर मला आधी चेष्टाच वाटली. शेवटी मी त्याला म्हणाले, अरे चेष्टा पुरे आज एक एप्रिल नाहीय. पण त्याने टीव्हीवरही अशी माहीती चालू असल्याचं मला सांगितलं. मग मला ही बातमी खरी असल्याचं कळलं.'
ही बातमी कळली तेव्हा सावनी घरी होती. पण तिचे सगळे कुटुंबिय पुण्याला होते. ' हो, माझा नवरा, सासू-सासरे सगळे पुण्याचे. मी मुंबईत आले की एकटी राहते. आणि मग ही बातमी कळल्यावर मला आनंद तर झालाच. पण आता ही बातमी शेअर कुणाशी करावी तेच कळेना. कारण माझ्या घरच्यापैकी कुणीही माझ्यासोबत नव्हतं. त्यामुळे थोडं वाईट वाटत होतं. शेवटी माझा नवरा तातडीने पुण्याहून निघून मुंबईत आला.'
सावनीला बार्डो सिनेमात गायिलेल्या घर पेटलं.. या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याबद्दल बोलताना ती म्हणाली, हे गाणं खूप इंटेन्स होतं. त्यासाठी ते गाणं समजून घेणं आवश्यक होतं. हे गाणं आम्ही रेकॉर्ड केलं तेही साध्या छोट्या स्टुडिओमध्ये. हा ट्रॅक ऐकून घेतल्यावर मी संगीतकार रोहन-रोहन यांना म्हणाले, मला या गाण्याचा फील घ्यायचाय. त्यानंतर त्या खोलीतले सगळे लाईट्स बंद करून पूर्ण अंधारात मी ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं. त्यातली वेदना मला माझ्यात उतरवायची होती. त्यानंतर आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं. म्हणून हे गाणं वेगळं झालं आहे. या गाण्यातला माझा आवाजही नेहमीसारखा नाहीय. याचा थ्रो खूप वेगळा आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यावर तुम्हाला त्याचा अंदाज येईल. बाकी इतर गाणी माझ्या नेहमीच्या पठडीतली असतात. पण हे गाणं खूपच वेगळ झालं आहे, असं सावनी सांगते.
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खरंतर आजवर मला लाभलेल्या सर्व गुरूंची मला प्रकर्षाने आठवण आली. दुर्दैवाने यांच्यापैकी आज कोणी हयात नाहीत. आता इथून पुढे जबाबदारी वाढल्याचंही भान असेल. या पुरस्काराने आनंद दिला आहे शिवाय, कामाचं समाधानही मिळालं आहे हे नक्की, असंही सावनीने बोलताना आवर्जून नमूद केलं.
संबंधित बातम्या :