Marathi Movies in Film Awards 2021: मराठी चित्रपटांत बार्डो सर्वोत्कृष्ट आनंदी गोपाळ, पिकासो, त्रिज्याचीही दखल
भारत सरकारच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अख्त्यारित येणाऱ्या Directorate of Film Festivals या संस्थेतर्फे 2019 च्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
नुकत्याच जाहीर झालेल्या 2019 च्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीनेही आपली छाप सोडली आहे. यात आवर्जून नावं घ्यावी लागतील ती बार्डो, आनंदी गोपाळ, त्रिज्या, पिकासो, खिसा यांची. याशिवाय, विवेक वाघ यांच्या जक्कल या चित्रकृतीलाही गोरवण्यात आलं आहे.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून यावेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो बार्डो या चित्रपटाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, हा पुरस्कार खरंच बळ देऊन जाणार आहे. या चित्रपटाची कथा माझी असून पटकथा मी आणि श्वेता पेंडसे यांची आहे. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वीच तयार आहे. तो प्रदर्शित तर करायचा आहेच. पण पुरस्कारांची सुरूवात राष्ट्रीय पुरस्कारांपासून व्हावी असं वाटत होतं. आता झालं तसंच. हा पुरस्कार मिळाल्याचं समाधान आहे. येत्या काळात हा चित्रपट आम्ही प्रदर्शितही करू.' या चित्रपटांत अंजली पाटील, मकरंद देशपांडे, अशोक समर्थ यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष बाब अशी की या चित्रपटासाठी गायलेल्या रान पेटलं या चित्रपटासाठी गायिका सावनी रवींद्र या गायिकेलाही सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
National Film Awards 2021 | 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
याशिवाय, आनंदी गोपाळ या चित्रपटालाही सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं आहे. आनंदी गोपाळ हा आनंदीबाई यांच्या जीवनावर बेतलेला चित्रपट होता. या चित्रपटाला लोकाश्रयही चांगला मिळाला. ताजमाल या चित्रपटाला नर्गिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर राष्ट्रीय पुरस्कारांत विशेष दखल घेतली गेली आहे ती अभिजीत वारंग याच्या पिकासो या चित्रपटाची. या चित्रपटात प्रसाद ओकची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात दशावतार या लोकनाट्यात काम करणाऱ्या लोककलावंताच्या जगण्याभवती हा चित्रपट फिरतो. तर लता भगवान करे या चित्रकृतीत काम केलेल्या लता करे यांचीही विशेष दखल या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये घेतली गेली आहे.
उदाहरणार्थ नेमाडे, स्थलपुराण अशा चित्रपटांची निर्मिती करणारा दिग्दर्शक अक्षय इंडिकरच्या त्रिज्या या चित्रपटाल्या साऊंड डिझाईनसाठीही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्रिज्यासाठी मंदार कमलापुरकर या साऊंड डिझायनरला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विशेष बाब अशी की यंदा राष्ट्रीय पुरस्कारासाठीची जी समिती होती त्याचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं ते एन चंद्रा या दिग्दर्शकाकडे. याशिवाय, कंगना रनौत, मनोज वाजपेयी या कलाकारांनाही सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कोकणी चित्रपट काजरो.. ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ जाहीर झालं आहे. या पुरस्कारामुळे कोकणी चित्रपटसृष्टीला बळ मिळायला हरकत नाही.