Abhijeet Guru: 'तर कलाकार नाही, पहिलं लेखकाला बदलतात', दिग्गज मालिका लिहिणाऱ्या मराठी लेखकाचा धक्कादायक खुलासा
ज्या लेखकाशिवाय तुमची कलाकृती सुरुच होऊ शकत नाही.तुमच्या कलाकृतीचं उगमस्थान जिथून सुरु होतं त्या लेखकालाच तुम्ही मान देत नाही. असं म्हणत या लेखकानं हा खुलासा केलाय.
Abhijeet Guru: मनोरंजनविश्वात कायम लेखकाला कमी मान दिला जातो, कमी मानधन दिलं जातं अशी तक्रार कायम होत असते. एखाद्या मालिकेत किंवा सिनेमात काही कमी जास्त होतंय असं लक्षात आलं तर कलाकारला नाही लेखकाला बदललं जातं. याला जमत नाही.. याला काढा असं म्हटलं जातं. अनेकांना न कळवताच काढून टाकलं जातं, असा धक्कादायक खुलासा एका मराठी मालिका लिहिणाऱ्या दिग्गज लेखकानं केला आहे. सेलिब्रीटी कट्टाला दिलेल्या मुलाखतीत लेखक अभिजीत गुरु यानं लेखकांच्या वागणूकीवर आपलं मत मांडल्याचं दिसलं.
सलीम जावेदनं पेंटर बोलवून स्वत:ची नावं टाकली..
हिंदीतले दिग्गज सलीम जावेद यांच्या एका डॉक्यूमेंट्रीच्या पोस्टरवर त्यांनी स्वत: जाऊन नाव छापली असं सांगतअभिजीतने लेखकांना दिली जाणारी वागणूक आणि मानधन याविषयी हा खुलासा केला. सलीम जावेद यांनी जंजीरच्या पोस्टरवर स्वत: पेंटर बोलवून नाव लिहून घेतलं होतं. कारण त्या काळात लेखकांची नावंच यायची नाहीत असंही सांगत हे पाऊल त्यांना का उचलायला भाग पाडलं अभिजीत म्हणाला.
लेखकाला मान दिला जात नाही
आपण जर एखाद्या कलाकृतीचा शेवटून उलटा प्रवास पाहिला तर सर्वात आधी कोरं पान येतं. ज्या लेखकाशिवाय तुमची कलाकृती सुरुच होऊ शकत नाही.तुमच्या कलाकृतीचं उगमस्थान जिथून सुरु होतं त्या लेखकालाच तुम्ही मान देत नाही. त्याचं पोस्टरवर नावच नसतं. किंवा त्याला कुठुनच पुढं आणलं जात नाही.
कलाकार नाही आधी लेखकाला बाहेर काढलं जातं
एखाद्या मालिकेत किंवा सिनेमात काही कमी जास्त होतंय असं लक्षात आलं तर कलाकारला नाही लेखकाला बदललं जातं. याला जमत नाही.. याला काढा असं म्हटलं जातं. अनेकांना न कळवताच काढून टाकलं जातं. माझ्यासोबत हे झालं नाही. पण मी लेखकांच्या गटातला आहे. अनेकांचे अनुभव आहेत. अचानक फोन करून सांगितलं जातं की उद्यापासून तुम्ही हे काम करणार नाही. अनेकांना काढून मला मालिका मिळाली. मी फोन करून विचारल्यावर अनेकांचं असं व्हायचं की माझा ट्रॅकच त्यांना पटला नाही...मग काढून टाकलं.
लेखकाला कलाकारांपेक्षा कमी मानधन मिळतं..
मालिकेत किंवा सिनेमात जे कलाकार काम करतात त्यांच्यापेक्षा लेखकाला कमी मानधन दिलं जातं असंही अभिजीत गुरु याने मुलाखतीत सांगितलं. आपण कितीतरी ॲवॉर्ड फंक्शन पाहतो. कुठलातरी लेखक स्टेजवर पुरस्कार द्यायला आलाय हे आपण पाहतो का? हे परदेशात नाही. तिथे लेखकांना खूप मान दिला जातो. आपल्याकडे ही मालिका कोण लिहितं हे ही माहित नसतं. असं अभिजीत म्हणाला.