Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Ganesh Naik Vs Eknath Shinde : भाजपच्या वरिष्ठांनी जर सांगितलं तर एकनाथ शिंदेंचा भ्रष्टाचार बाहेर काढू असं गणेश नाईक म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी शिंदेंना थेट आव्हान दिलं होतं.

नवी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्या वादामुळे चर्चेत आलेल्या नवी मुंबई महापालिकेमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. भाजप 72 जागांवर आघाडीवर असून शिंदेंची शिवसेना केवळ 28 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे गणेश नाईकांनी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी एकनाथ शिंदे यांचा 'टांगा पलटी' केल्याचं दिसून आलं.
नवी मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार ताकद लावल्याचं दिसून आलं. त्यातून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्धही झाल्याचं दिसून आलं. एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला, तर गणेश नाईकांनीही त्याला प्रत्युत्तर देत शिंदेंना आव्हान दिलं.
गणेश नाईकांचं शिंदेंना आव्हान
एकनाथ शिंदे यांच्याकडे हरामाचा पैसा आहे, नवी मुंबईच्या विकासासाठी असलेल्या सिडकोच्या जमिनी त्यांनी विकल्या आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला. भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं तर शिंदेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांचा 'टांगा पलटी, घोडे फरार' करणार असं आव्हान गणेश नाईकांनी दिलं होतं. आता गणेश नाईकांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला आणि नवी मुंबईवर पुन्हा एकदा सत्ता काबीज केली.
संजीव नाईकांचा हल्लाबोल
भाजपचे नेते संजीव नाईक यांनी यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी लोकांना काहीही आश्वासनं दिली. नगरविकास खात्याचं मंत्री असल्याचं सांगत धमक्या दिल्या. पाच वर्षांसाठी दोन तासांसाठी येऊन जनता कधीही सोबत राहणार नाही. त्यामुळे त्यांचा टांगा पलटी घोडे फरार झाला.
शिंदे यांच्याकडे हरामाचा पैसाच आहे. त्यांनी कुणाकुणाकडून, कॉन्ट्रॅक्टरकडून पैसा कसा घेतला याची यादी आहे. उद्यापासून आमची खरी लढाई सुरू होईल असं म्हणत संजीव नाईक यांनी शिंदेंना आव्हान दिलं. तसेच शिंदेंनी गणेश नाईकांनाच नव्हे तर जनतेलाही हलक्यात घेतलं, त्यामुळे आज त्यांचा पराभव झाल्याचा टोला संजीव नाईकांनी लगावला.
कोविड काळानंतर सत्ता नसतानाही गणेश नाईकांनी लोकांची कामं केली, त्यामुळेच नवी मुंबईकर त्यांच्यामागे उभे राहिले असं संजीव नाईक म्हणाले. पाच वर्षात फक्त दोन तास नवी मुंबईत यायचं आणि विकास करतो म्हणायचं हे चालणार नाही असं संजीव नाईक म्हणाले.
ही बातमी वाचा:




















