Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी
BMC Election Result : केळुसकरांनी '50 खोके एकदम ओक्के'च्या घोषणा देत शिंदेंच्या उमेदवाराला डिवचलं होतं. तर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी केळुसकरांना एबी फॉर्म चोर म्हटलं होतं.

मुंबई : महापालिका निवडणुकीमधील सर्वाधिक लक्षवेधी लढत म्हणून पाहिल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक 173 चा निकाल लागला आहे. या ठिकाणी भाजपचा डुप्लिकेट एबी फॉर्म जोडलेल्या शिल्पा केळुसकरांनी (Shilpa Keluskar) विजय मिळवला आहे. शिल्पा केळुसकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे यांचा 1722 मतांनी पराभव केला. हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मधून महायुतीकडून शिंदेंच्या सेनेला जागा सोडण्यात आली होती. या ठिकाणी शिंदेंचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, भाजपच्या शिल्पा केळुसकरांनी त्यांना दिलेल्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढला आणि पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला होता. आता त्यांचा विजय झाला आहे.
Shilpa Keluskar BMC Result : केळुसकर-कांबळेंमध्ये जोरदार लढत
शिल्पा केळुसकर यांनी पूजा कांबळे यांचा 1722 मतांनी पराभव केला असून तो शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणुकीच्या दरम्यान केळुसकरांच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या उमेदवाराला उद्देशून '50 खोके एकदम ओक्के' घोषणा देऊन डिवचलं होतं. त्यानंतर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी केळुसकराना 'एबी फॉर्म चोर' असं म्हटलं होतं.
प्रभाग क्रमांक 173 मधून भाजपने शिल्पा केळुसकर यांना आधी एबी फॉर्म दिला होता. मात्र ही जागा शिंदेंना गेल्यानंतर त्यांनी तो परत मागवून घेतला. मात्र शिल्पा केळुसकरांनी त्या फॉर्मची कलर झेरॉक्स काढली आणि ती झेरॉक्स लावून फॉर्म भरला.
ही गोष्ट भाजपच्या लक्षात आल्यानंतर मुंबईचे अध्यक्ष अमीत साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिल्पा केळुसकरांचा अर्ज ग्राह्य धरू नये अशी विनंती केली होती. तरीही निवडणूक आयोगाने शिल्पा केळुसकर यांचा अर्ज ग्राह्य धरला होता.




















