आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना आता दुप्पट अनुदान
मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
Mumbai News: गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळत आहेत. या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट उद्योगातील चित्रपट, टिव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माते, तंत्रज्ञ यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यामागे महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि या चित्रपट निर्मात्यांनी अधिक चांगल्या सिनेमाची निर्मिती भविष्यात करावी हा उद्देश आहे. मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळावी, प्राईम स्लॉट मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक घेण्यात येईल.
गेल्या अनेक वर्षांपासून गोरेगावच्या चित्रनगरीत अनेक मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. या मालिका निर्मात्यांना पहिल्या वर्षी चित्रीकरण भाड्यात 50 टक्के तर दुसऱ्या वर्षी 25 टक्के सूट देण्यात येते. यापुढे मालिका पहिल्या वर्षानंतर चालू राहिल्यास त्यांना चित्रीकरण भाड्यात 25 टक्के सूट देण्यात येईल. चित्रनगरीत चित्रीकरण करण्यासाठी दर आकारण्यात येतात, हे दर किती असावे, ते कधी नेमके वाढवण्यात यावे याबाबत धोरण ठरविण्यात येणार असल्याने मुनगंटीवार यांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे पर्यटन क्षेत्रात चित्रीकरण शुल्कात सूट
चित्रनगरीमध्ये एक खिडकी योजना सुरू असून यामध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली जाते. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे पर्यटन क्षेत्रात चित्रीकरण करावयाचे असल्यास पूर्वी 54 हजार प्रती दिवस शुल्क होते. मात्र यापुढे मराठीसाठी 30 हजार रुपये आणि अन्य भाषेसाठी 35 हजार रुपये प्रती दिवसाचे चित्रीकरण शुल्क असेल असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
चित्रनगरीचे अत्याधुनिकीकरण करण्याबाबत आराखडा
दादासाहेब फाळके चित्रनगरीचा परिसर 521 एकरने व्यापलेला आहे. चित्रनगरी परिसरात एकूण 15 कलागारे असून 70 बाह्य चित्रिकरण स्थळे आहेत. आजपर्यंत चित्रनगरीत अनेक मराठी, हिंदी अन्य भाषांच्या चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात येत असून आजही अनेक चित्रपट, मालिका तसेच प्रसिध्द कथाबाहय कार्यक्रमांचे चित्रीकरण होत आहेत. येणाऱ्या काळात या चित्रनगरीचे अत्याधुनिकीकरण करण्याबाबत आराखडा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 65 जागांचे नूतनीकरण यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील नाट्यगृहांचे अत्याधुनिकीकरण याबाबतही नियोजन करण्यात येत आहे.