Prajakta Mali on Nonveg: नॉनव्हेज खाणाऱ्यांना प्राजक्ता माळीचा धोक्याचा इशारा; म्हणाली, 'सडलेलं मांस शरीरात गेल्यास...'
Prajakta Mali on Nonveg: उत्तम आरोग्यासाठी कोणता आहार चांगला? शाकाहारी असावं की, मांसाहारी? याबाबत अनेकदा अनेकांच्या चर्चा रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता प्राजक्ता माळीनं आपल्या चाहत्यांना अनोखा सल्ला दिला आहे.

Prajakta Mali on Nonveg: मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) प्राजक्ता माळी (Prajakta Mali) म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. प्राजक्ता माळी आपल्या क्लासी अंदाजासाठी ओळखली जाते. प्राजक्ता अभिनेत्री तर आहेच, पण त्यासोबतच ती उत्तम कवयित्री आहे. याव्यतिरिक्त 'प्राजक्तराज' नावाचा एक ज्वेलरी ब्रँडही ती चालवते. तसेच, तिचं एक आलिशान फार्महाऊसही आहे. सध्या प्राजक्ता माळी सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोचं सूत्रसंचालन करते. तिची एक मुलाखत सध्या व्हायरल होत असून तिनं त्यामध्ये नॉनव्हेज का सोडलं? या मागचं कारण सांगितलं आहे.
उत्तम आरोग्यासाठी कोणता आहार चांगला? शाकाहारी असावं की, मांसाहारी? याबाबत अनेकदा अनेकांच्या चर्चा रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग, अनेकजण यावर आपापली मतं देतात. काहीजण यापलिकडे जाऊन व्हिगन होतात. अनेक सेलिब्रिटीही वेगवेगळे डाएट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच आता प्राजक्ता माळं हिने प्रेक्षकांना दिलेला एक सल्ला आगळावेगळा सल्ला दिला आहे. प्राजक्तानं दिलेला सल्ला सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्राजक्तानं केलेल्या या वक्तव्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
जेवढं ताजं अन्न तुम्ही खाल, तेवढा तजेलदारपणा तुमच्या चेहऱ्यावर येईल : प्राजक्ता माळी
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली की, "मी दोन गोष्टी प्रकर्षाने पाळते. एक म्हणजे उत्तम खाणं आणि दुसरं उत्तम दिनचर्या. या दोन्ही गोष्टी फॉलो केल्याच पाहिजेत. तुम्ही जे अन्न खाता त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. तुम्ही मैदा जास्त प्रमाणात खात आहे तर तुम्ही मैद्यासारखेच होणार. त्यामुळे शिळ पॅकेज फूड वगैरे खाऊ नका. जेवढं ताजं अन्न तुम्ही खाल, तेवढा तजेलदारपणा तुमच्या चेहऱ्यावर येईल. शक्य तेवढं लवकर झोपून पहाटे लवकर उठणे गरजेचे आहे. रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागून तुम्ही सुंदर दिसाल असं वाटत असेल तर ते शक्य नाही. या सगळ्यात व्यायाम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे."
"आठवड्यातून तीन वेळा तरी व्यायाम केला पाहिजे. मी स्वतः योग करते. मोकळ्या हवेत योग करणे खूप फायदेशीर असतं. एसी लावून योग करू नका. या गोष्टी केल्या तर सौंदर्यप्रसाधने अगदीच दुय्यम वाटू लागतात. तुमच्या पोटात जे जातात तेच सर्वांगावर रिफ्लेक्ट होत असतं. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नेहमी चेहरा स्वच्छ धुवा. बाहेरून आल्यावर आंघोळ करणं खूप महत्त्वाचं आहे. झोपायच्या आधी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. चेहरा क्लीन करून त्यावर टोनर, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर वगैरे लावा. शूटिंग नसेल तर मी अजिबात मेकअप करत नाही नेहमी कमीत कमी मेकअप कसा करता येईल याकडे माझा कल असतो.", असंही प्राजक्ता माळी म्हणाली.
मांसाहाराबाबत काय म्हणाली?
प्राजक्ता म्हणाली की, "मी शाकाहारी आहे. मांसाहार करणाऱ्या लोकांचा मी विरोध करत नाही, त्यामुळे माझ्यावर चिडू नका पण एक उदाहरण सांगेन की, आपल्या शरीरात नॉनव्हेज पचण्यासाठी 72 तास लागतात. प्राण्यांची पचन संस्था वेगळी असते आणि माणसांची वेगळी असते. त्यामुळे मला वाटतं नॉनव्हेज हे माणसांसाठी बनलेलं नाही. बर आहे मी सांगत नाहीये यावर अनेक डॉक्युमेंटरी सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. मी आधी नॉनव्हेज खायचे मग त्यानंतर सोडलं."
"कोणतेही पदार्थ खाल्ल्यावर त्यामध्ये दोन तासांचा गॅप पाहिजे. जर समजा तुम्ही 2 वाजता जेवलात तर पुढे चार वाजेपर्यंत काहीच खायचं नाही. मधल्या वेळेत पाणी प्या पण काही खाऊ नका. मी फरसाण खाते हे सगळीकडे व्हायरल झाले पण या गोष्टी कधी कधी खायच्या. याची रोजची सवय लावायची नाही. एखाद्या लग्नात गेल्यावर मी खूप जेवले तर दुसऱ्या दिवशी लंघन करते. लंघन म्हणजे उपवास.... आदल्या दिवशी खूप खाल्लं असेल तर दुसऱ्या दिवशी मी फक्त फळ खाऊन उपवास करते.", असं प्राजक्ता माळी म्हणाली.
प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, नुकत्याच आलेल्या चिकी चिकी बूबूम बूम या चित्रपटात ती दिसली होती. प्राजक्तासोबतच या सिनेमात स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रसाद खांडेकर, रोहित माने आणि प्रथमेश शिवलकर हेसुद्धा दिसून आले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























