(Source: Poll of Polls)
मनाचे श्लोक चित्रपटाच्या नावावरून कांगावा, थिएटर गाठत दमदाटी; हिंसा, धमक्यांनंतर अजित पवार गट समोर आला, भूमिका काय?
संत रामदासस्वामींच्या ग्रंथाशी संबंधित पवित्र शब्द असल्याने त्याचा वापर करणे धार्मिक भावना दुखावणारे आहे, अशी भूमिका काही संघटनांनी मांडली. आता अजित पवार गटाने त्यांची भूमिका मांडली आहे.

Manache Shlok Marathi Movie Controversy: अलीकडे “मनाचे श्लोक” या मराठी चित्रपटावर काही धार्मिक संघटनांनी विरोध व्यक्त केला आहे. या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत “मनाचे श्लोक” हा संत रामदासस्वामींच्या ग्रंथाशी संबंधित पवित्र शब्द असल्याने त्याचा वापर करणे धार्मिक भावना दुखावणारे आहे, अशी भूमिका काही संघटनांनी मांडली. यानंतर हा चित्रपट नव्या नावासह प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतला आहे. या सर्व घटनाक्रमावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग आक्रमक झाला आहे. (Ajit Pawar NCP) त्यांनी एक पत्रक काढत या चित्रपटाच्या संदर्भात झालेल्या संपूर्ण घडामोडींचा निषेध करीत चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले की, कलाक्षेत्रात शीर्षक हे अनेकदा प्रतीकात्मक अर्थाने वापरले जाते, आणि ते नेहमीच धार्मिक किंवा धार्मिक भावनांवर आधारित असतेच असं नाही.
Manache Shlok Controversy: मनाचे श्लोक चित्रपटावरून वाद
“मनाचे श्लोक” या मराठी चित्रपटाला अनेक हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. या विरोधी संघटनांनी या चित्रपटाच्या शीर्षकाचा धार्मिक ग्रंथाशी संबंद असल्याचे कारण दर्शवून, चित्रपट बंद करावा किंवा नाव बदलावे, अशी मागणी केली आहे. परंतु, चित्रपट हे कलाकृतीचं माध्यम आहे. कलाकार, दिगदर्शक, निर्माता यांना अभिव्यक्तीचे अधिकार आहेत आणि त्या अधिकाराला संरक्षण असले पाहिजे. विरोध करताना हिंसा, धमकी, थिएटरमध्ये धडक देणे, बॅनर फाडणे, प्रदर्शन बंद करणे अशा मार्गांचा स्वीकार कलास्वातंत्र्याच्या मूलभूत तत्त्वांना धक्का देते.
भारतीय चित्रपटसृष्टीत अशा अनेक उदाहरणांचा भरणा आहे. जिथे चित्रपटाचं नाव धार्मिक असलं, तरी विषय पूर्णपणे वेगळा आहे. उदाहरणार्थ मराठीत देऊळ, बाळकडू, विट्ठल, हर हर महादेव, तुकराम यांसारखे चित्रपट हे समाजातील वास्तव, मानवी मूल्ये, इतिहास किंवा तत्त्वज्ञान मांडतात. पण धार्मिक प्रचारक चित्रपट नाहीत. तसंच हिंदीमध्ये OMG, PK, Satyam Shivam Sundaram, Ram Teri Ganga Maili, Lakshmi, Annapoorani: The Goddess of Food यांसारख्या चित्रपटांनी धर्म, समाज आणि श्रद्धेवर विचारप्रवर्तक संवाद साधला आहे. “मनाचे श्लोक” हाही तसाच एक चित्रपट आहे. जो मानवी मन, विचार, नैतिक संघर्ष आणि समाजातील वास्तव यावर प्रकाश टाकतो. धार्मिक नाव असणं म्हणजे धार्मिक विषय असणं नव्हे. शीर्षक हे एक तत्त्वज्ञानात्मक रूपक आहे, आणि कलात्मक अभिव्यक्ती म्हणून त्याचा आदर केला जाणं आवश्यक आहे.
कलाकार आणि निर्मात्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे: अजित पवार गट
यासंदर्भात 'एबीपी माझा'शी बोलतांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले की, "कलाकार आणि निर्मात्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. समाजात मतभेद असू शकतात, पण तो संवाद संविधान आणि संस्कृतीच्या मर्यादेत, शांततेने आणि विवेकाने व्हावा. प्रत्येक चित्रपटाला चर्चेची, नव्या विचारांची आणि स्वीकृतीची संधी मिळाली पाहिजे. हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या आणि भारताच्या लोकशाही संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे.



















