14 वर्षांपूर्वी केलेल्या 'बर्ड फ्ल्यू' गाण्यामुळे पोल्ट्री व्यवसाय वाचला होता, यावेळी तसं होईल का? महेश टिळेकरांची फेसबुक पोस्ट व्हायरल
कोरोना महामारीतून बाहेर येत असलेल्या राज्यात 'बर्ड फ्ल्यू'चं नव संकट आल्याने पोल्ट्री व्यवसाय गोत्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी 14 वर्षांपूर्वी केलेल्या 'बर्ड फ्ल्यू' गाण्याची आठवण सांगितली आहे.
मुंबई : कोरोना महामारीशी दोन हात करत असलेल्या राज्यात 'बर्ड फ्ल्यू'चं नव संकट आल्याने पोल्ट्री व्यवसाय गोत्यात आला आहे. अशा परिस्थिती निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी 14 वर्षांपूर्वी केलेल्या 'बर्ड फ्ल्यू' गाण्याची आठवण सांगितली आहे. या गाण्यामुळे 2006 साली शेतकऱ्याचा जोडधंदा कुकुटपालन व्यवसाय वाचला होता, अशी फेसबुक पोस्ट लिहीत तो व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओने पुन्हा एकदा जनजागृती होऊन पोल्ट्री व्यवसाय वाचावा, अशी आशा टिळेकर यांनी व्यक्त केली आहे.
महेश टिळेकर यांची फेसबुक पोस्ट काय? तात्या मामा ऐका जरा.. नैसर्गिक संकटामुळे हतबल झालेला शेतकरी आणि अचानक उद्भवलेल्या बर्ड फ्ल्यूमुळे शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री उद्योग उपजिविकेसाठी आधार असणाऱ्या अनेकांना डोळ्या पुढे अंधार दिसत आहे. 2006 मध्ये बर्ड फ्ल्यूने थैमान घातलं होतं. तेव्हा शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले होते. अश्यावेळी डोक्यात एक कल्पना आली की बर्ड फ्ल्यू बद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आपण काहीतरी केले पाहिजे. माझी कल्पना निळूभाऊ फुले यांना सांगितली आणि मी एक गाणं लिहिलं. गाण्यात सहभागी होण्यासाठी माझ्या एका शब्दावर निळूभाऊ फुले, कुलदीप पवार, वर्षा उसगावकर, आशा काळे आणि मिलिंद गवळी या कलाकारांनी होकार दिला.
अन् पुन्हा अंडी चिकनचे भाव वाढले : महेश टिळेकर एका दिवसात पुण्याजवळील एका गावात शुटींग केलं. जेव्हा हे गाणं टीव्ही चॅनेल, दूरदर्शन वर सगळीकडे दिसू लागलं, तेव्हा ह्या गाण्यामुळे खूप मोठा परिणाम झाला. त्यावेळी 2006 मध्ये आजच्या सारखा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत नव्हता की व्हॉट्सॲप हा प्रकारही अस्तित्वात नव्हता. पण ह्या गाण्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना खूप फायदा झाला. अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये आमच्या गाण्यात सहभागी असलेले निळूभाऊ, मी जमलेल्या लोकांसमोर चिकन खाऊन दाखवायचो त्याचा आणि आम्ही केलेलं गाणं लोकप्रिय झाल्यामुळे लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि पुन्हा अंडी चिकनचे भाव वाढले. आपल्याकडून खारीचा वाटा म्हणून काहीतरी मदत झाली याचा आनंद आजही आहे. 14 वर्षांपूर्वी केलेलं बर्ड फ्ल्यू गाणं आज पुन्हा उद्भवलेल्या बर्ड फ्ल्यूच्या संकटात पुन्हा एकदा जनजागृती करेल अशी आशा आहे, अशी फेसबुक पोस्ट निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी लिहली आहे.