नव्या योजनांसाठी सेलिब्रेटींची राज्य सरकारकडे धाव, राज्याला गरज असताना पाठ दाखवून पळ!
एरवी सवलती नव्या योजना मागण्या राज्य सरकारच्या गळी उतरवण्यासाठी पुढं पुढं करणारी हेच सेलिब्रेटी आता राज्याला गरज आहे तेव्हा पाट लावून पळू लागलीत.
मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊन होण्याची नुसती चर्चा काय सुरू झाली. तमाम टीव्ही इंडस्ट्रीने महाराष्ट्राला पर्याय शोधायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून मनोरंजन विश्वाशी बातचीत केली होती. त्यावर आपण पाठिंबा देऊ असंही सगळे प्रोड्युसर्स सर्व संघटना म्हणाल्या. पण झालं उलट. राज्यात 15 दिवसांची ब्रेक द चेन लागली आणि हिंदी पाठोपाठ मराठी मालिका विश्व दमण गोवा सिल्वासा, बेळगावकडे सरकलं. एरवी महाराष्ट्राचे गोडवे गाणारे कलाकार या राज्याशी इथल्या माणसांशी मातीशी कसलाही संबंध नसल्यागत निघून गेले.
चला हवा येऊ द्या जयपूर, देवमाणूस बेळगाव, अग्गोबाई सुनबाई गोवा, पाहिले न मी तुला गोवा इतकंच काय, आई कुठे काय करते, सहकुटुंब सहपरिवार, मुलगी झाली हो या मालिका सिल्वासाला गेल्या आहेत. तर फुलाला सुगंध मातीचा अहमदाबादला.
हरकत नाही. शो मस्ट गो ऑन म्हणतात म्हणून असेल. निदान महाराष्ट्राचं ते मनोरंजन करतील हेही काही कमी नाही. पण आता बॉलिवूड सेलिब्रेटींचं काय सांगाल? 15 दिवस काम थांबली नाहीत तर लगेच कलाकार राज्य सोडून बाहेर पडण्यात धन्यता मानतायत.
टायगर दिशा पटनी, सारा अली खान ही अनेक मंडळी मालदीवला दाखल झालीत. राज्यात मिळालेल्या उपचारांनी बरे झालेले रणबीर, आलियाही लगेच देशाबाहेर पळाले. दीपिका पदुकोण तर बेंगलोरला गेली आहे. शाहरुख खानची पत्नी गौरी न्यूयॉर्कला गेलीय मुलांसोबत. अभिनेत्री अनन्या पांडे ही न्यूयॉर्कला गेलीय.
राज्यात शूटिंग जरा थांबवली तर लगेच राज्य सोडून मंडळी बाहेर चालली. राज्यात कोरोना वाढतोय.. कुठं बेड नाहीत कुठं ऑक्सिजन नाहीय.. पोलीस डॉक्टर यांच्यावर ताण आहे.. अशात समाजाचे हे सो कॉल्ड प्रतिनिधी गरजेला राज्याच्या मदतीला आणि दिमतीला धावणार की असा पळ काढणार?
एरवी सवलती नव्या योजना मागण्या राज्य सरकारच्या गळी उतरवण्यासाठी पुढं पुढं करणारी हेच सेलिब्रेटी आता राज्याला गरज आहे तेव्हा पाट लावून पळू लागलीत. कुठं आहेत अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रणवीर सिंग असे समाजाचे नायक. समाज तुम्हाला देतो तेव्हा तुम्हीही देणं लागता त्यांचे. पण या आळवावरच हे पाणी हा राकट देश हा कणखर देश बघतोय.