Madhuri Dixit Banned Song: माधुरी दीक्षितचं 'हे' गाणं दुरदर्शन, रेडियोवर केलेलं बॅन; कोर्टापर्यंत पोहोचलेलं प्रकरण, नंतर बाळासाहेब ठाकरेंना मध्यस्थी करुनही...
Madhuri Dixit Banned Song: माधुरीचं हे गाजलेलं गाणं 1993 चा तिचा सुपरहिट सिनेमा 'खलनायक'मधलं आहे. ऐकून धक्का बसला ना?

Madhuri Dixit Banned Song: बॉलिवूडची (Bollywood News) धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत. साठीच्या उंबरठ्यात असलेली ही अभिनेत्री आजही आपल्या सौंदर्यानं कित्येकांच्या काळजाचा ठोका चुकवते. माधुरीचे सिनेमे पाहताना आजही अनेकजण पापणीही पाडत नाहीत. 1990 चं दशक गाजवणारी ही अभिनेत्री आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहे. बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री माधुरीसोबत काम करण्याचं कित्येक सुपरस्टार्सचं स्वप्न आहे. पण, याच माधुरीचं एक गाजलेलं गाणं एकदा अडचणीत सापडलेलं. माधुरीच्या या गाण्यावरुन मोठा वाद निर्माण झालेला. हा वाद एवढा विकोपाला गेलेला की, टेलिव्हिजन आणि रेडिओवर बंदी घालण्यात आलेली. माधुरीचं हे गाजलेलं गाणं 1993 चा तिचा सुपरहिट सिनेमा 'खलनायक'मधलं (Khal Nayak Movie) आहे. ऐकून धक्का बसला ना? 'खलनायक' सिनेमातलं गाणं, जे आजही आवडीनं ऐकलं जातं तेच बॅन करण्यात आलेलं... ते गाणं होतं... 'चोली के पीछे क्या है' (Choli Ke Peeche Kya Hai Song).
माधुरीच्या एका गाण्यानं माजलेली खळबळ
सुभाष घई दिग्दर्शित, 'खलनायक' सिनेमामध्ये संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसून आलेले. फक्त 4 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 21 कोटी रुपयांची कमाई केलेली. मात्र, सिनेमा रिलीज झाल्यानंतर अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायलेल्या 'चोली के पीछे क्या है' या गाण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी या गाण्यातील बोल अश्लील आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं होतं. या गाण्याला एवढा तीव्र विरोध करण्यात आलेला की, हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. तक्रारदारांनी सेन्सॉर बोर्डाकडे सिनेमातून हे गाणं काढून टाकण्याची आणि आधीच विकल्या गेलेल्या कॅसेट्स परत मागवण्याची मागणी केलेली.
कोर्टानं गाण्याच्या बाजूनं दिलेला निकाल
प्रकरण कोर्टात पोहोचल्यानंतर मोठा गदारोळ झालेला. कोर्टानं निर्णय दिला की, गाण्यात काहीच आपत्तीजनक नाही... तरीसुद्धा वाद शांत झाला नाही... तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) या गाण्याचं समर्थन केलेलं. गाण्याबद्दल बोलताना बाळासाहेब ठाकरे म्हणालेले की, यामध्ये काहीच चुकीचं नाही आणि विरोध करणं तात्काळ थांबवलं पाहिजे. तरिसुद्धा दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडियोनं आपल्या स्तरावर गाणं बॅन केलेलं. त्यामुळे टिव्ही आणि रेडिओवर या गाण्याचं प्रसारण करण्यात आलं नाही.
रिमेकनं जिंकली मनं
त्याकाळी बॅन करण्यात आलेलं हे गाणं नंतर एवढं प्रसिद्ध झालं की, आजही या गाण्यावर अनेकजण थिरकतात. तसेच, 2024 मधला करिना कपूर, तब्बू आणि कृती सेनॉनच्या क्रू सिनेमात या गाण्याचं रिमेक वर्जन होतं. यावेळी, हे गाणं चित्रपटाचं पार्श्वसंगीत बनलेलं आणि प्रेक्षकांना ते खूप आवडलं. 'चोली के पीछे क्या है' हे गाणं त्यावेळी केवळ प्रसिद्ध झालं नाही तर, दशकांनंतरही त्याचं वर्चस्व आहे. माधुरीच्या अदा आणि सुभाष घई यांच्या कलात्मकतेचे एक उत्तम मिश्रण असलेलं हे गाणं आजही लोकांच्या ओठी आपल्याला ऐकायला मिळतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























