'एका विशिष्ट वर्गाने मराठी सिनेमा अन् नाटकांतून..'; कॉ. शरद पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने किरण मानेंची पोस्ट
Kiran Mane on Sharad Patil : 'एका विशिष्ट वर्गाने मराठी सिनेमा अन् नाटकांतून..'; कॉ. शरद पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने अभिनेते किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane on Sharad Patil : अभिनेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते किरण माने सोशल मीडियावर आपली राजकीय आणि सामाजिक मतं बेधडकपणे मांडताना दिसतात. सध्या किरण माने यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. कॉम्रेड शरद पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने किरण माने यांनी त्यांना फेसबुकवर पोस्ट लिहित अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी शरद पाटील यांनी समतेसाठी केलेल्या कार्याबाबत त्यांनी सविस्तरपणे भाष्य केलंय.
किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी
आपल्याकडं पुर्वीपासून एका विशिष्ठ वर्गानं मराठी सिनेमा, नाटक, मालिका, कथा, कादंबर्यांमधून सांस्कृतिक राजकारण खेळलंय. मनोरंजनाच्या नांवाखाली शातीरपणे वर्चस्वाचा कावेबाज डाव रचलाय. एक लक्षात ठेवा माझ्या भावाबहिणींनो, 'कला' ही फक्त करमणूक करणारी गोष्ट नसते. त्यातून नकळत समाजावर काही मुल्यं, काही संस्कार, काही परंपरा आणि काही आदर्श रूजवले जातात. ...अशावेळी एका विशिष्ठ वर्गानं या क्षेत्रावर कब्जा करून त्यांना पूरक अशा विषमतावादी विचारधारेची पाळंमुळं समाजमनात पसरवली. या डावपेचांपासून समाजाला सावध करायचं असेल, तर त्यांच्या कलाकृतींमधून त्यांनी 'काय दाखवलं' यापेक्षा 'काय लपवलं?' हे शोधणं आणि समाजासमोर मांडणं जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या समाजात जिथं 'जात' ही एक ठसठशीतपणे दिसणारी व्यवस्था आहे, तिथं 'दिसणं' आणि 'दिसू न देणं' यामध्येच मोठं सांस्कृतिक राजकारण लपवलं जातं.
...कॉ. शरद पाटील यांचा 'सौतांत्रिक दृष्टिकोन' समजून घेतल्यानंतर मी याविषयी खुप सजग झालो... आणि जेव्हा बारकाईनं कलाक्षेत्राकडं बघू लागलो तेव्हा हे 'राजकारण' बघून थक्क झालो. सिनेमात बघून बघून आपल्याला जे अगदी 'नॅचरल' वाटतं ते वर्चस्वाचं सर्वात बेमालूम रूप असू शकतं. उदाहरणार्थ, पुर्वी सिनेमामधला व्हिलन हा 'पाटील' असायचा... त्या पाटलाच्या हाताखालच्या गुंडांमध्ये जातउतरंडीमधल्या इतर व्यक्ती असायच्या. त्याच सिनेमातली उच्चवर्णीय व्यक्ती मात्र ‘व्रतस्थ गुरुजी’, ‘समंजस शिक्षक’, ‘सांस्कृतिक मार्गदर्शक’, ‘प्रेम करणारा' अशा रूपात यायची. हे सगळं इतक्या बेमालूमपणे रचलं जातं की सामान्य प्रेक्षकाला त्यातलं 'राजकारण' जाणवत नाही. पाटलाला खलनायक ठरवणं हे उच्चजातवर्चस्वी मांडणीनं कपटानं बनवलेलं एक कवच बनतं. ज्या वर्गानं हजारो वर्ष शोषण केलं, तो वर्ग व्हिलन म्हणून कधीच उभा केला जात नाही. बहुजनांना धर्माचा धाक दाखवून लुबाडणारे कावेबाज पुरोहित… आध्यात्मिक गुरु बनून महिलांचं शोषण करणारे भोंदू… हा वर्ग सिनेमात व्हिलन म्हणून क्वचितच दिसला. मध्ययुगीन काळात पाटीलकी ही उच्चवर्गीयांकडेही होती, हे लपवलं जातं.
प्रभातच्या 'संत तुकाराम' सिनेमात डॅशिंग तुकोबांची प्रतिमा बदलून त्यांना देवभोळे, टाळकुटे, अतिभाबडे दाखवणं… ‘राजसंन्यास’ नाटकातून गडकरीनं छत्रपती संभाजी महाराजांना दारुडे, लफडेबाज असं रंगवणं… आणि आजकाल नाटकसिनेमांतून छत्रपती शिवरायांच्या फक्त मुस्लिम विरोधी लढाया दाखवत रहाणं, स्वकियांनी केलेले अपमान आणि छळ लपवणं हा ही या सांस्कृतिक राजकारणाचाच भाग आहे.'सौतांत्रिक दृष्टी' म्हणजे शब्दांच्या आड असलेल्या सावल्या पाहणं. असे शब्द सतत आपल्या नेणीवेत पेरले जातात. उदाहरणार्थ वैदिक संस्कृतीला नाकारून क्रांती करणार्या बुद्धांचे विचार कमी लेखण्यासाठी अलगदपणे मुर्ख माणसासाठी 'बुद्धू' हा शब्द रूढ करणं आणि बहुजनांचं आराध्य दैवत असलेल्या देवतेच्या नांवाचा वापर करून 'भटकभवानी'सारखे शब्द वापरात आणणं. बौद्ध धम्मात वृद्ध, ज्येष्ठ, श्रेष्ठ व्यक्तींना ‘थेर’ म्हणतात आणि आपल्याकडे एखाद्याला वयावरून हिणवताना ‘थेरडा’ हा शब्द प्रचलित केला गेला आहे, हा योगायोग नाही. सांस्कृतिक वर्चस्वाच्या बेड्या तोडून मला मुक्त करणारी 'सौतांत्रिक दृष्टी' देऊन माझ्यातला कलाकार समृद्ध करणार्या कॉ. शरद पाटील यांची काल जयंती झाली. विनम्र अभिवादन कॉम्रेड !
इतर महत्त्वाच्या बातम्या























