(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Mane : ठाकरे गटात प्रवेश करताच किरण मानेंची प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाले,"अशी' आपली माणसं"
Kiran Mane on Prabodhankar Thackeray : अभिनेते किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव ठाकरे गटात (Shiv Sena Uddhav Thackeray) प्रवेश केला आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा आज महानिकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश करताच प्रबोधनकार ठाकरे यांच्यासंदर्भात खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांचा एक प्रेरणादायी किस्सा सांगणारी पोस्ट किरण माने यांनी शेअर केली आहे. किरण माने यांनी लिहिलं आहे,"तुम्ही जर शिवाजी कॉलेजला माझे नाव देणार असाल तर मी तुम्हाला दोन लाख रुपये देणगी देतो. खान्देशातल्या एका श्रीमंत माणसाने कर्मवीर भाऊराव पाटील यांना निरोप पाठवला. रयत शिक्षण संस्थेला त्यावेळी खूप गरज होती. कर्मवीर मदतीसाठी शोध घेत होते. दोन लाखांची तूट भरून काढायची होती".
"काय खतरनाक माणसं होती राव आपली"; किरण माने असं का म्हणाले?
"एका सेकंदाचाही विचार न करता कर्मवीरांनी त्या पैसेवाल्याला उत्तर पाठवलं, "एकवेळ मी माझ्या जन्मदात्या बापाचं नाव बदलेन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कदापीही बदलणार नाही. तुमची देणगी गेली उडत."काय खतरनाक माणसं होती राव आपली. कुणीतरी कर्मवीरांना या विषयावर विचारलं असता ते म्हणाले,"हा बाणेदारपणा मी माझे गुरू प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून घेतला आहे".
View this post on Instagram
किरण मानेंनी पुढे लिहिलं आहे,"प्रबोधनकारांनी नुकतीच सरकारी नोकरी सोडली होती. कारण नोकरी सांभाळत दूसरीकडे बहुजन समाजाच्या जागृतीचं कार्य..व्याख्यानं..पुस्तकं लिहीणं.. त्यातून सरकारी धोरणांवर टीका... खूप ओढाताण होत होती. दिली सोडून नोकरी. बहुजनांच्या सेवेचं काम सुरू केलं. पण पोटापाण्याचं काय? मग टांग्यांना कलर देणं, दुकानाचे बोर्ड रंगवणं... बुक बाईंडींगपास्नं पत्र्याचे डबे तयार करण्यापर्यंत वाट्टेल ते केलं त्यांनी. बोर्ड रंगवताना वर्चस्ववादी बघे मुद्दाम गर्दी करायचे,"हे बघा बहुजन समाजाचे उद्धारक. पैसा कमावण्यासाठी काय वेळ आली बघा ठाकर्यांवर." असं ट्रोलिंग करत ते फिदीफिदी हसायचे.
शाहू महाराजांची मदत न घेतलेले ठाकरे
ठाकरेंना लोक हसतात हे शाहू महाराजांना कळल्यानंतर त्यांनी मदत म्हणून त्यांना 5000 रुपयांचा चेक पाठवला होता. तो घेऊन गेलेल्या माणसाच्या अंगावर चेक फेकून प्रबोधनकार कडाडले,"असल्या भिकेवर थुंकतो मी. जा घेऊन. असल्या रकमा फेकून महाराज माणसं विकत घेत असतील, तर त्यांच्याविषयी माझा आदर ओहोटीला लागला. सांगा जाऊन त्यांना."
त्यानंतर समक्ष भेटून शाहूमहाराज म्हणाले, "लै गुर्मी आली व्हय? आमच्या चेकवर थुंकतो तू?" त्यावर नम्रपणे प्रबोधनकार म्हणाले, "माफ करा सरकार, पैशाच्या जोरावर तुमची ओझी वहाणारा गाढव बनणं मला मंजूर नाही." दोघेही खळखळून हसले. कारण पूर्वी कधीतरी शाहूमहाराज ठाकरेंना म्हणाले, "पैसा बघून अनेक माणसांची गाढवं झालेली मी बघितली आहेत. त्यानंतर छत्रपतींनी अतिशय नम्रपणे प्रबोधनकारांना पुस्तक छपाईसाठी 5000 रूपयाची देणगी दिली. एवढंच नाही, तर त्या पुस्तकांच्या 2000 प्रती स्वतः संस्थांनासाठी खरेदी केल्या”. यावर “अशी आपली माणसं आणि असे एकेक प्रेरणादायी किस्से’ असं किरण माने म्हणाले.
संबंधित बातम्या