IC 814 Web Series : 'IC 814' वेब सीरिजचा वाद; 'त्या' विमानाच्या पायलटने सांगितल्या आणखी दोन चुका
IC 814 Web Series : अपहरण झालेल्या IC 814 विमानातील पायलटने या वेब सीरिजमधील आणखी दोन चुका सांगितल्या आहेत.
IC 814 Web Series : 'आयसी 814 द कंदहार हायजॅक' (IC 814 The Kandahar Hijack) ही वेब सीरिज रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 1999 मधील इंडियन एअरलाइन्स विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित 'IC 814 The Kandahar Hijack' वेब सीरिजमध्ये दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी दहशतवाद्यांची नावे बदलून गैर-मुस्लिम नावे ठेवली असल्याच्या मुद्यावरून आरोप सुरू आहेत. या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणीदेखील करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे अपहरण झालेल्या विमानातील पायलटने या वेब सीरिजमधील आणखी दोन चुका सांगितल्या आहेत.
'IC 814 The Kandahar Hijack' या वेब सीरिजमध्ये अभिनेता विजय शर्मा याने इंडियन एअरलाइन्सच्या IC 814 विमानाचे पायलट कॅप्टन देवी शरण यांची भूमिका साकारली होती. देवी शरण यांच्या पुस्तकावर ही वेब सीरिज आधारीत आहे. आता, कॅप्टन देवी शरण यांनी या वेब सीरिजमधील दोन चुका सांगितल्या आहेत.
View this post on Instagram
कॅप्टन देवी शरण यांनी काय सांगितले?
देवी शरण यांनी टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दहशतवाद्यांच्या नावांव्यतिरिक्त निर्मात्यांनी मालिकेतील आणखी दोन घटना बदलल्या आहेत. त्यांनी सांगितले की, “परराष्ट्र मंत्री आम्हाला सलाम करतात असे मालिकेत दाखवले आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी आम्हाला सलामच केला नाही. "त्यांनी फक्त हावभावाने आमच्या प्रयत्नांचे कौतुक केले."
View this post on Instagram
दुसरी चूक कोणती?
देवी शरण यांनी पुढे म्हटले की, “याशिवाय, मी स्वतः पाइपलाइनची दुरुस्ती केली नव्हती. त्यांनी (तालिबान अधिकाऱ्यांनी) एक कर्मचारी पाठवला होता. मी त्या कर्मचाऱ्याला माझ्यासोबत विमानाच्या होल्डमध्ये घेऊन गेलो. त्याला विमानातील पाइपलाइन कुठे आहे, याची माहिती नव्हती. त्यानेच पाइपलाइन दुरुस्त केली. मात्र, सीरिजमध्ये मीच पाइपलाइनची दुरुस्ती करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
वेब सीरिज रिलीज झाल्यानंतर फोन कॉलचा सपाटा
अपहरण झालेल्या विमानातील चार ते पाच प्रवासी कॅप्टन देवी शरण यांच्या संपर्कात होते. त्यांनी सांगितले की, वेब सीरिज रिलीज झाल्यानंतर आयुष्यात काही बदल झाले. विमानात माझ्या नावाची घोषणा झाल्यानंतर काही प्रवाशांनी मला ओळखले. तर, माझ्या ओळखीतील अनेकांचे फोन कॉल्स सध्या येत असल्याचेही शरण यांनी सांगितले.