Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; रुग्णवाहिकेतून घराच्या दिशेनं रवाना, सुपरस्टारसोबत लेक बॉबी देओल
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून रुग्णवाहिकेतून घरी नेण्यात आलं आहे.

Dharmendra Health Update: बॉलिवूडचे (Bollywood) अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून रुग्णवाहिकेतून घरी नेण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत रुग्णवाहिकेत बॉबी देओल उपस्थित आहे. तसेच, नेमकी धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट आणि अधिकृत माहिती मिळालेली नाही.
अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीक समदानी यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, "त्यांच्यावर बऱ्याच काळापासून माझ्याकडून उपचार सुरू आहेत. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, परंतु उपचार प्रक्रिया, म्हणजेच त्यांचे उपचार घरीही सुरू राहतील."
धर्मेंद्र यांची प्रकृती होती नाजूक, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात सूरू होते उपचार
गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती, म्हणूनच त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यापूर्वी सनी देओलच्या टीमनं धर्मेंद्र बरे होत असल्याचं आणि उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं होतं. सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्याशी संबंधित विविध बातम्या येऊ लागल्या. त्यांच्या मृत्यूच्या अफवाही वेगानं पसरल्या, त्यानंतर त्यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी यासर्व अफवांचं खंडन करत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं.
























