Dharmaveer Trailer Launch : ‘आनंद दिघे हेच खरे दबंग’, ‘धर्मवीर’च्या ट्रेलर लाँचला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सलमान खानची विशेष उपस्थिती!
Dharmaveer : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा भव्य सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहकुटुंब हजर होते.
Dharmaveer : सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा ऐकायला मिळतेय, तो म्हणजे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer). शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा भव्य सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहकुटुंब हजर होते. तर, अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान (Salman Khan) यांनी देखील विशेष उपस्थिती लावली. यावेळी सलमान खान याने आपल्याला ट्रेलर आवडला असल्याची प्रतिक्रिया चक्क मराठीतून दिली.
‘आनंद दिघे हेच खरे दबंग’, असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. या खास सोहळ्याला शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होती.
आनंद दिघे आणि माझ्यात बरंच साम्य : सलमान खान
चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सलमान खानने देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सलमान म्हणाला, ‘आनंद दिघे आणि माझ्यात बरंच साम्य आहे.’ यावेळी सलमान खानने चक्क मराठीतून संवाद साधला. सलमान म्हणाला, ‘माझं नाव सलमान खान. मला या चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला.’ यानंतर सलमान म्हणाला, मी आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत होतो तेव्हा आनंद दिघे यांच्याबद्दल काही गोष्टी कळल्या, ज्या मला आमच्यात सारख्या वाटल्या. आनंद दिघे एका बेडरूममध्ये राहायचे आणि मी पण एक बेडरूममध्येच राहतो. त्यांचंही लग्न झालं नव्हतं आणि माझंही लग्न झालेलं नाही. याआधीही धर्मवीर नावाचा चित्रपट आला, जो तुफान चालला. या चित्रपटालाही तितकेच यश मिळो, असं म्हणत सलमान खानने शुभेच्छा दिल्या.
प्रसाद ओकची खास एन्ट्री
या ट्रेलर लाँचिंग सोहळ्यात चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक खास त्यांच्या वेशात आणि त्यांच्या स्टाईलमध्ये अवतरला होता. त्याच्या एन्ट्रीने उपस्थित सगळेच भारावून गेले होते. ट्रेलरमध्येही या चित्रपटाची दमदार झलक पाहायला मिळाली आहे. लाखो बहीणींचा लाडका भाऊ ते दुर्जनांचा कर्दनकाळ, अशी त्यांची एक झलक यात पाहायला मिळाली.
झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या 13 मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :