(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravi Jadhav : 'नटरंग' ते 'टाइमपास 3'... कसा होता दिग्दर्शक रवी जाधव यांचा मराठी सिनेसृष्टीतील प्रवास? पोस्ट चर्चेत
Ravi Jadhav : रवी जाधव यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ravi Jadhav : दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) नेहमीच काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करत असतात. ते त्यांच्या सिनेमात नेहमीच नवा प्रयोग करतात. नटरंग, बीपी, टाईमपास असे त्यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. लवकरच त्यांचा 'अनन्या' आणि 'टाईमपास 3' हे सिनेमे प्रदर्शित होणार आहे. या सर्व सिनेमांवर भाष्य करणारी रवी जाधव यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रवी जाधव यांनी सिनेसृष्टीत प्रयोग करायला सुरुवात केली त्याला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर 136 सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. रवी जाधव यांनी लिहिले आहे, "11 वर्षांचा प्रवास 136 सेकंदांमध्ये दाखविणे खरतर अत्यंत कठीण काम. या वर्षात दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून अगदी मोजकं काम केलं पण त्यात दर्जा राखला. वेगवेगळे जॉनर्स शिकण्याचा आणि हाताळण्याचा प्रयत्न केला".
View this post on Instagram
रवी जाधव यांनी पुढे लिहिले आहे," यातील एक दोन सन्माननिय अपवाद वगळता सर्वच प्रयत्नांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या वर्षी 2022 ला लवकरच माझे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. दोन्हीही अत्यंत वेगवेगळ्या प्रकृतीचे. एक अडचणींवर मात करुन जगण्याची प्रेरणा देणारा ‘अनन्या’ आणि दुसरा बिनधास्त निखळ आनंद देणारा ‘टाइमपास 3’".
अनन्या सिनेमा 15 जुलैला प्रदर्शित होणार आहे. तर टाइमपास 3 च्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर होईल. रवी जाधव यांच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहते कमेंट्स करत आहेत.
संबंधित बातम्या