मनोरंजन क्षेत्रासोबत उद्या मुख्यमंत्री संवाद साधणार? शंका निरसनासाठी आदेश बांदेकर यांच्या पुढाकाराने बैठकीचं नियोजन
राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनोरंजन क्षेत्रासोबत उद्या मुख्यमंत्री संवाद साधण्याची शक्यता आहे. अभिनेते आदेश बांदेकर यांच्या पुढाकाराने ह्या बैठकीचं नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होते आहे. या अनलॉकिंगचे वेगवेगळे टप्पे तयार करण्यात आले असून एक ते पाच असे टप्पे तयार करण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने हे अनलॉकिंग सुरू होणार आहे. यातली मनोरंजन क्षेत्रासाठी दिलासादायक बाब अशी की तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या ठाणे, मुंबई आणि नाशिक या भागात चित्रिकरण सशर्त सुरू करता येणार आहे. या निर्णयाचं स्वागत सर्वांनीच केलं असलं तरी काही संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय या क्षेत्रातल्या मान्यवरांशी ऑनलाईन संवाद साधणार असल्याचं खात्रीशीर वृत्त आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, निर्माते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्या पुढाकारातून या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
सरकारने जो अध्यादेश काढला आहे, त्यात चित्रिकरणाबद्दल सूचित करताना पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात चित्रिकरणाची परवानगी दिली आहे. पण तिसऱ्या टप्प्यात ही परवानगी देताना त्यातल्या रकान्यामध्ये बबल असं नमूद करून स्वल्पविराम देऊन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बाह्य चित्रिकरण करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. या शर्तीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. जर बबल करायचा असेल तर मग पाच पर्यंत चित्रिकरण करण्याची अट का? कारण बायोबबलमध्ये एकदा चित्रिकरण सुरू केल्यानंतर आपण कितीही वेळ चित्रिकरण करू शकतो. कारण, या बबलमध्ये कुणी बाहेरचं आत येत नाही आणि आतले कोणी बाहेर जात नाही. शिवाय, पाच वाजेपर्यंत बाहेरील चित्रिकरण करता येईल असं नमूद केल्यामुळे मग बबल करावा की नाही असे काही संभ्रम निर्माण झाले आहेत. अर्थात, या अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू व्हायला अद्याप दोन दिवस आहेत. या कालावधीत आणखी अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण मिळणार आहे.
हा संभ्रम दूर करण्यासाठी आणि एकूणच मनोरंजन क्षेत्राचं महत्व लक्षात घेऊन आदेश बांदेकर यांनी मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधून त्यांची उद्याची म्हणजे रविवारची वेळ घेतल्याचं कळतं. बांदेकर यांच्यासोबत अभिनेते सुबोध भावे यांनीही या बैठकीसाठी पाठपुरावा केला असल्याचं कळतं. मुख्यमंत्री महोदयांनीही उद्याची वेळ दिलेली आहे. परंतु, रविवारी ही ऑनलाईन बैठक कधी होईल ते अद्याप ठरलेलं नाही. आज सायंकाळपर्यंत उद्याची वेळ ठरेल असं नाव न सांगण्याच्या अटीवर मनोरंजनसृष्टीतल्या मान्यवर पदाधिकाऱ्याने सांगितलं. याबद्दल आदेश बांदेकर यांच्याशीही एबीपी माझाने संपर्क साधला असता ते म्हणाले, 'मनोरंजन क्षेत्र या नव्या अध्यादेशामुळे आनंदित झालं आहेच. पण त्यासोबत क्षेत्रातल्या मान्यवरांना अनेक शंका आहेत. सर्वांचेच काही ना काही प्रश्न आहेत. त्याप्रमाणे सर्व प्रमुख संघटना, ब्रॉडकास्टर्स यांच्याशी समन्वय साधून त्यांच्यासह मुख्यमंत्र्यांसोबत मी बैठकीची मागणी केली आहे. ज्या क्षणी ही वेळ मिळेल त्यावेळी ही बैठक होईल.'