Chinmay Mandlekar : 'मतदार लोकशाहीची सर्वात जास्त ठासतात', चिन्मय मांडलेकरनं स्पष्टचं म्हटलं
Chinmay Mandlekar on Election : अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर याने नुकतच निवडणुकांविषयी भाष्य केलं आहे.
Chinmay Mandlekar on Election : लोकसभा निवडणुका (Lok Sabha 2024) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यातच अनेक कलाकार मंडळी देखील यंदाच्या लोकसभेच्या मैदानात उतरली आहे. पण या सगळ्यात मतदार म्हणून कलाकार मंडळींना काय वाटतं याची देखील अनेकांना उत्सुकता असते. नुकतच अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने निवडणुकांविषयी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे त्याने त्याच्या राजकीय भूमिकेचा देखील यावेळी खुलासा केला असल्याचं पाहायला मिळतंय.
अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर याने अजब -गजब या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी चिन्मयने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. चिन्मयला नुकताच त्याच्या गालिब या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे चिन्मयने यावेळी मराठी सिनेसृष्टीतील लेखक यावरही अनेक मुद्दे मांडेल.
मतदार लोकशाहीची सर्वात जास्त ठासतात - चिन्मय मांडलेकर
चिन्मयाला यावेळी ती सोशल मीडियावर तुझं मत व्यक्त करताना फारसा दिसत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर चिन्मयनं म्हटलं की, 'माझ्यासाठी आपण निवडणुकीत देतो ते महत्त्वाचं आहे आणि ते मी दर निवडणुकीत न चुकता देतो. मी खूप अभिमानाने सांगू शकतो की मी 18 वर्षांचा झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत मत दिलं आहे आणि मी प्रत्येकवेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना मत दिलं आहे.'
हीच माझी राजकीय भूमिका - चिन्मय मांडलेकर
' काम करेल त्याला मत द्या अशी माझी राजकीय भूमिका आहे. कारण जे लॉयल मतदार असतात ते लोकशाहीची सर्वात जास्त ठासतात. मी पंरपरागत मतदार नाही. माझं एकच आहे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. जर काम केलं असेल, मला असं वाटलं की हा चांगला उमेदवार आहे, बऱ्याचदा असं होतं की त्या राजकीय पक्षांची भूमिका तुम्हाला पटत नाही, पण त्यांनी तुमच्या भागात उमेदवार चांगला दिलेला असतो, अशावेळी मी त्यांना मतदान देतो' असं स्पष्ट मत चिन्मयने यावेळी व्यक्त केलं.
मी नोटाला कधीच मत देत नाही - चिन्मय मांडलेकर
पुढे बोलताना चिन्मयने म्हटलं की, 'मी नोटाला कधीच मत देत नाही. त्यामुळे मी न चुकता कोणालातरी मत देतो. माझं एकच मत असेल पण माझ्यासाठी त्या एका मताची किंमत सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे आपल्याला जे काही हक्क मिळाले आहेत, ते बजावणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे.'