Chhaya Kadam At Cannes Film Festival 2025: 'गो! तुम्ही दिलेली साडी नेस्हान...आईची नथ नाकात..'; जिवाभावाच्या मैत्रिणींनी दिलेली साडी नेसून छाया कदम कान्समध्ये मिरवल्या
Chhaya Kadam At Cannes Film Festival 2025: जिथे इतर अभिनेत्री दिग्गज फॅशन डिझायनर्सचे महागडे डिझायनर ड्रेसेस निवडतात, तिथे छाया कदम आपल्या आईची साडी नेसून दिमाखात कान्सच्या रेड कार्पेटवर उतरल्या.

Chhaya Kadam At Cannes Film Festival 2025: यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival 2025) जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अशातच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही (Bollywood Celebrity) यंदा कान्समध्ये आपला डेब्यू केला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर, आलिया भट्ट, ऐश्वर्या राय यांसारख्या अभिनेत्रींनी आपल्या अदांनी कान्सचं रेड कार्पेट गाजवलं. पण, यासर्व अभिनेत्रींमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं आपल्या मैत्रिणींनी दिलेली साडी, आपल्या आईची नथ आणि कानातले घालून सोज्वळ लूकनं सर्वांना भूरळ पाडली. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणीच नसून आपल्या अभिनयाची छाप जगभरात उमटवणारी गुणी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam).
आपल्या अभिनयाच्या जोरावर केवळ मराठी फिल्म इंडस्ट्रीच नव्हे तर संपूर्ण बॉलिवूड आणि चक्क हॉलिवूडही गाजवणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी गेल्या वर्षी कान्समध्ये आपल्या आईची साडी नेसून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. जिथे इतर अभिनेत्री दिग्गज फॅशन डिझायनर्सचे महागडे डिझायनर ड्रेसेस निवडतात, तिथे छाया कदम आपल्या आईची साडी नेसून दिमाखात कान्सच्या रेड कार्पेटवर उतरल्या. त्यांच्या साधेपणानं आणि आईसाठीच्या प्रेमानं सारेच भारावून गेले. अशातच यंदाच्या वर्षी छाया कदम काय करणार? असा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला. यावर्षीही छाया कदम यांनी आपल्या साडीची जादू दाखवली.
काही दिवसांपूर्वीच मूळच्या कोकणातल्या असलेल्या छाया कदम आपल्या गावी गेलेल्या. तिथे त्यांनी आपल्या बालपणीच्या मैत्रीणींसोबत छान वेळ घालवला. आपली मैत्रीण एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलीय, याचा त्यांच्या साऱ्या मैत्रिणींनाही फार अभिमान होता. त्यासाठीच त्यांनी छाया यांचा साडी देऊन सत्कार केला. आपल्या मैत्रिणींनी प्रेमानं भेट दिलेली साडी छाया कदम यांनी यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेसली होती. आणि त्यासोबत कानात त्यांच्या आईचे कानातले आणि नाकात आईचीच नथ घातली होती. छाया कदम यांच्या सोज्वळ आणि साध्यासुध्या लूकनं सारचे भारावून गेले.
View this post on Instagram
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हणाल्यात छाया कदम?
आपल्या कान्सच्या लूकचे फोटो शेअर करत छाया कदम यांनी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये छाया कदम म्हणाल्या की, "Cannes Film Festival आणि साडी हे जणू माझ्यासाठी एक सुंदर असे समीकरणच जुळून येत आहे . मागील वर्षी आईची साडी आणि नथ Cannes मध्ये मला घेऊन जाता आली याचा प्रचंड आनंद असतानाच यावर्षीच्या Cannes च्या निमित्ताने माझ्या गावच्या जिवाभावाच्या मैत्रिणींनी खूप मायेने मला भेट दिलेली ही साडी फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी मी जणू मोरपिसा सारखी पांघरूणच घेतली."
"मागच्या वर्षी Cannes मधून पुन्हा आले तेव्हा अनेक जवळच्या माणसांनी प्रेमाने - आपुलकीने माझा सत्कार केला. पण हा सत्कार माझ्यासाठी खास यासाठी होता की या सगळ्या जणींनी आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्यातून वेळ काढून आजवरचा त्यांनी केलेला पहिला सत्कार होता. त्यामुळे माझ्यासोबतच त्यांनीही तो इतका दिलखुलास साजरा केला की त्यांचा आनंद त्यांच्या मनमुराद नाचण्यात -बागडण्यात आणि धिंगाणा घालण्यात दिसत होता.", असं छाया कदम म्हणाल्यात.
आपली माणसं - त्यांचे प्रेम आणि त्यातून मिळणारी आपलेपणाची ऊब याचे मोल सातासमुद्रा पार देखील अमूल्यच असते. "गो ! तुम्ही दिलेली साडी नेस्हान. आईची नथ नाकात घालून आणि तिचेच कानातले घालून कान्सच्या समुद्रार लय मिरावलय."", असं छाया कदम यांनी म्हटलंय.
दरम्यान, 'न्यूड', 'फँड्री', 'सैराट', 'रेडू' यांसारख्या मराठीतील वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसोबतच छाया कदम यांनी 'लापता लेडीज', 'बोर्डवी', 'सिस्टर मिडनाइट' यांनी बॉलिवूड सिनेमे केले. त्यासोबतच त्यांनी काही हॉलिवूड सिनेमेही केलेत.























