'चला हवा येऊ द्या' पुन्हा सुरु होणार? भाऊ कदमच्या साथीला गौरव मोरेची एन्ट्री, श्रेया बुगडेने दिले मोठे संकेत
Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' पुन्हा सुरु होणार, भाऊ कदमच्या साथीला गौरव मोरेची एन्ट्री, श्रेया बुगडेने दिले मोठे संकेत

Chala Hawa Yeu Dya : मराठी टेलिव्हिजनवरील अनेक कार्यक्रमांमध्ये “चला हवा येऊ द्या” (Chala Hawa Yeu Dya) या विनोदी कार्यक्रमाने विशेष स्थान मिळवले आहे. 2014 पासून झी मराठी वाहिनीवर सुरू झालेला हा कार्यक्रम आजही तितकाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे आणि आजही त्याची लोकप्रियता अबाधित आहे. दरम्यानच्या काळात या कार्यक्रमात सृजनशिलता राहिली नाही, अशी टीका झाली. त्यानंतर हा कार्यक्रम बंद देखील पडला. हा कार्यक्रम बंद पडल्यानंतर चाहते नाराज झालेले पाहायला मिळाले. मात्र, आता “चला हवा येऊ द्या” (Chala Hawa Yeu Dya) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे बोलले जात आहे. कारण अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने याबाबतचे संकेत दिले आहेत.
अभिनेता श्रेयस तळपदे सध्या 'चल भावा सिटीत' हा कार्यक्रम होस्ट करत आहे. या कार्यक्रमात श्रेया बुगडे आणि अभिनेता गौरव मोरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी दोघांनीही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दरम्यान, यावेळी श्रेया बुगडे आणि गौरव मोरे यांनी केलेल्या संवादावरुन “चला हवा येऊ द्या” पुन्हा एकदा सुरु होणार असे बोलले जात आहे.
या कार्यक्रमात श्रेयस तळपदे श्रेया बुगडेला म्हणतो की, 'तुझं काम खूप मोठं आहे, महाराष्ट्रभर लोक तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात. त्यांना असं वाटतं की तुला पुन्हा पुन्हा बघत राहावं, तर काहीतरी ठरव.' ...यावर प्रत्युत्तर देत असताना श्रेया बुगडे म्हणते, 'मीही प्रेक्षकांना तितकंच मिस करते, या मंचावर परफॉर्म करणं मिस करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, झी मराठी प्रेक्षकांना कधीच नाराज करत नाही. काहीतरी कुजबूज मी देखील ऐकली आहे, लोकही विचारत आहेत, प्रेक्षकही उत्सुक आहेत. दरम्यान, श्रेयाच्या या प्रत्युत्तरानंतर श्रेयस तळपदे म्हणतो की, तू जी हिंट दिलीस ती आपल्या स्मार्ट प्रेक्षकांना लक्षात आली असेल.
"चला हवा येऊ द्या" हा एक विनोदी कार्यक्रम असून तो प्रामुख्याने नाट्यप्रकारात सादर होतो. यात वेगवेगळ्या विनोदी स्किट्स (लघुनाटिका), चालू घडामोडींवर भाष्य, तसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची मुलाखत हे सगळं असतं. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे त्यातील कलाकारांचे सहजसुंदर अभिनय, त्यांच्या संवादफेकीतील हास्य आणि त्यांची सामाजिक विषयांवर केलेली हलकीफुलकी टीका.
या कार्यक्रमात कुशल बद्रिके, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, गिरीश कुलकर्णी, श्रेणिक पर्णेकर, तुषार देवकर अशा अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने विशिष्ट भूमिका साकारत त्या पात्रांना जनमानसात लोकप्रिय केलं आहे. उदा. भाऊ कदम यांचा "पप्पा", सागर कारंडे यांची "बाई", आणि कुशल बद्रिकेचा "डॉक्टर प्रविण". या कार्यक्रमात केवळ हास्य नसते तर अनेकवेळा सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक विषयांवर देखील भाष्य केले जाते. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबर विचार करण्याचं खाद्यही मिळतं. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातला संवाद आणि त्यातली आपुलकी या कार्यक्रमाची आणखी एक खासियत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या


















