हवा येऊ द्या च्या पत्रांचा असाही गौरव..
पुणे ग्रामीण पोस्ट विभागातर्फे अरविंद जगताप यांचा सत्कार करण्यात आला. केवळ सत्कार करून पोस्ट विभाग थांबलं नाही. तर अरविंद यांचं पोस्टाचं तिकीटही काढण्यात आलं.
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यावर विशेष गाजणारा कार्यक्रम आहे तो म्हणजे चला हवा येऊ द्या. या कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे आदी सर्वच कलाकारांनी आपआपल्या कामातून रसिकांचं मनोरंजन केलं. विविध चित्रपटांच्या प्रमोशनसोबतच त्यातून ही मंडळी सादर करत असलेली नाटुकली रसिकांना भावली.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं यश हे निर्विवाद आहे यात शंका नाही. सर्वच कलाकार अत्यंत मेहनतीने हा कार्यक्रम सादर करत असतात. याच कार्यक्रमाला एक अत्यंत संवेदनशील, कारुण्याची किनारही आहे. ती आहे , या कार्यक्रमात येणाऱ्या पोस्टमन दादांची. सागर कारंडे पोस्टमनच्या वेषात येऊन अत्यंत महत्वाच्या विषयावरची पत्र वाचत असतो. या पत्रातून सामान्य माणसाच्या ह्रदयाला हेलावून टाकणारा मजकूर लिहिण्यात आलेला असतो. या पत्रांचा लेखक आहे अरविंद जगताप. ही पत्रं जरी कलाकार वाचत असले तरी ते शब्दबद्ध केले जातात ते अरविंद जगताप यांच्या लेखणीतून. त्यांच्या पत्रांची त्यांच्या लिखाणाची हीच दखल घेऊन पुणे ग्रामीण पोस्ट विभागातर्फे अरविंद जगताप यांचा सत्कार करण्यात आला. केवळ सत्कार करून पोस्ट विभाग थांबलं नाही. तर अरविंद यांचं पोस्टाचं तिकीटही काढण्यात आलं. आणि त्यांना त्याची सुरेख भेटही देण्यात आली.
अरविंद जगताप यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. त्यांचं सर्वंच स्तरातून कौतुक होतं आहे. चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम आहेच. पण त्याचवेळी मराठी कलाकार हा संवेदनशीलही असतो त्याचं प्रदर्शन या कार्यक्रमातून वारंवार घडलं ते जगताप यांच्या लेखणीमुळे. कधी नदीवर. कधी शेतीवर.. कधी सामान्य माणसावर.. कधी कष्टकऱ्यांवर.. तर कधी मुंबईवर अशा विविध विषयांवर अरविंद यांनी पत्रं लिहिली आणि ती या कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहचली.
टीव्ही हे रंजनाचं माध्यम आहेच. पण सोबत चांगला कार्यक्रम दिला तर त्यातून आपण सामान्य लोकांच्या ह्रदयात हात घालू शकतो हे या पत्रांनी सिद्ध केलं. म्हणूनच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात. बऱ्याचदा हिंदी-मराठी सिनेमांचं प्रमोशन या कार्यक्रमातून होतं. पण तेवढ्यावर न थांबता या कार्यक्रमाने सामान्य लोकांच्या भावनांनाही या पत्राद्वारे व्यासपीठ दिलं. कधी पाठ थोपटली तर कधी अत्यंत नम्र भाषेत काही गोष्टी समजावूनही सांगितल्या. पोस्ट विभागाने या लेखकाचा गौरव करणं हे खरंतर अशा संवेदनशीलतेचाच गौरव म्हणायला हवा.
संबंधित बातम्या :