जेव्हा चला हवा येऊ द्याला प्रेक्षक नावं ठेवायला लागले, तेव्हा वाटलं संपलं आता सगळं : निलेश साबळे
चला हवा येऊ द्या फेम डॉ. निलेश साबळे आता एक नवा कोरो कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. झी युवा वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या 'लाव रे तो व्हिडीओ' या कार्यक्रमाचं शूटिंगही निलेश आपल्या पत्नीच्या मदतीने घरीच करत आहे.
मुंबई : दिग्दर्शक, विनोदवीर निलेश साबळे आता झी युवा वाहिनीवरील 'लाव रे तो व्हिडीओ' या कार्यक्रमाचंही सुत्रसंचालन करणार आहे. लॉकडाऊनमध्ये तुम्ही तुमच्या घरच्यांची करमणूक कशी केली, याचा व्हिडीओ झी युवा वाहिनीला पाठवायचा आहे. व्हिडीओ निवडला गेला तर, तो लाव रे तो व्हिडीओ कार्यक्रमाच्या भागात दाखवण्यात येणार आहे.
नुकतीच या कार्यक्रमाची व्हर्च्युअल पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेदरम्यान निलेशला बॉलिवूड घराणेशाही आणि सुशांतच्या आत्महत्येमुळे नवोदीत कलाकारांच्या मनात तयार झालेली भिती याबद्दल विचारलं असता, 'सिनेसृष्टी ही एक स्पर्धा आहे. स्पर्धेत पुढे जाणाऱ्याला मागे खेचणं ही न बदलता येणारी मानवी वृत्ती आहे. त्यामुळे खचून न जाता आपण आपल्या ध्येय गाठण्याचा सतत प्रयत्न करत राहायचा. तुमच्याकडे कला आणि टॅलेन्ट असेल तर तुमचं कधीच वाईट होणार नाही. मला सिनेसृष्टीचं बॅगग्राऊंड नाही. मला कोणी गॉडफादरही नाही, पण मला अजून तरी कुठलाही वाईट अनुभव आलेला आहे. एक काळ असा होता जेव्हा प्रेक्षक हवा येऊ द्याकडे पाठ फिरवायला लागले होते. चला हवा येऊ द्याचा टीआरपी पडत होता, प्रेक्षक कार्यक्रमाला नावं ठेवायला लागले होते तेव्हा एक क्षण असं वाटलं की संपलं आता सगळं संपलं पण दुसऱ्याच क्षणी हा विचार केला की, आता प्रेक्षकांना काय हवंय ते शोधूया. त्यांना जो कंटेंट हवाय तो देऊयात. आपण माघारी जाण्यासाठी या क्षेत्रात पाऊल ठेवलेलं नाही. पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्न करत रहायचं. हार मानायची नाही.' असं प्रेरणादायी उत्तर निलेशनं दिलं.
दरम्यान निलेशनं लाव रे तो व्हिडीओ कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी पाठवलेल्या व्हिडीओजचं खूप कौतुक केलं. त्यात एका आज्जींनी पाठवलेल्या डान्सच्या व्हिडीओचा निलेश वारंवार उल्लेख करत होता.
लाव रे तो व्हिडीओसाठी आलेल्या व्हिडीओजमध्ये निलेशला प्रचंड टॅलेंट दिसलं. यातील अनेकांना त्याच्या चला हवा येऊ द्या कार्यक्रमातही काम देऊ शकतो, असंही निलेश म्हणाला. निलेश लाव रे तो व्हिडीओ कार्यक्रमाचा दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता आहे. शिवाय कार्यक्रमाचे शूटिंगही तो त्याची पत्नी गौरीच्या मदतीनं घरातच करतोय. सध्या हवा येऊ द्याचं काम बंद आहे पण तो कार्यक्रम पुन्हा सुरु झाल्यावर दोन्ही कार्यक्रमांची धुरा सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत असेल, असंही यावेळी बोलताना निलेश म्हणाला. रात्रभर जागून काम करु पण प्रेक्षकांचं मनोरंजन करु हाच आमचा हेतू आहे, असंही निलेश म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या :
मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा साखरपुडा!
ज्येष्ठ कलावंतांना सेटवर परवानगी नाहीच, नियम-अटीत बदल करुन नवा अध्यादेश जारी