एक्स्प्लोर
मोहम्मद रफींचा आवाज जपणारा 'आवाज' काळाच्या पडद्याआड !
मोहम्मद अझीझ यांचे वयाच्या 64 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईतील नानावटी रूग्णालयात निधन झाले. 80 आणि 90 च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. 80- 90 च्या दशकात त्यांना मोहम्मद रफींचे उत्तराधिकारी म्हटले जायचे. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये 20 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत.

मुंबई : 'दिल बहलता है मेरा, आपके आ जाने से', 'खुदा गवाह' यासारख्या एकापेक्षा एक सरस गीतांना आपल्या आवाजाच्या जादूने सुपरहिट करणारे ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीझ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मोहम्मद अझीझ यांचे वयाच्या 64 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईतील नानावटी रूग्णालयात निधन झाले. 80 आणि 90 च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. 80- 90 च्या दशकात त्यांना मोहम्मद रफींचे उत्तराधिकारी म्हटले जायचे. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये 20 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. सोमवारी रात्री त्यांचा कोलकाता येथे एक कार्यक्रम होता. मंगळवारी दुपारी ते मुंबई विमानतळावर पोहचले. त्यावेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी उपचार सुरु करण्याआधी त्यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मुंबईत उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मोहम्मद अझीझ यांचा जन्म 2 जुलै 1954 ला पश्चिम बंगालच्या अशोक नगरमध्ये झाला होता. ‘दिल बहलता आपके आ जाने से’ या गाण्यामुळे अझीझ घराघरात पोहचले. मंगळवारी दुपारी एअरपोर्टवर जेव्हा मोहम्मद अझीझ उतरले तेव्हा त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. अझीझ यांचा सेक्रेटरी बबलू यांनी ही माहिती दिली. 1982 मध्ये गायक मोहम्मद अझीझ मुंबईत आले होते. मर्द टांगेवाला हे गाणे गाऊन त्यांनी अमिताभ बच्चन यांनाही आवाज दिला. हे गाणे मला मिळाले हा माझ्यासाठी भाग्याचा प्रसंग आहे अशी प्रतिक्रिया त्यावेळी अझीझ यांनी दिली होती. खुदा गवाह, आजकल कुछ और याद..., तेरा गम अगर न होता..., उंगली में अंगूठी..., पतझड़ सावन बसंत बहार.., प्यार हमारा अमर रहेगा..., आप के आ जाने से.., माय नेम इज लखन सारखी त्यांनी गायलेली अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत.
आणखी वाचा























