(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Irsal : 'नाद केला ना तर बाद करीन'; 'इर्सल' चा ट्रेलर प्रदर्शित
Irsal : बहुचर्चित 'इर्सल' सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Irsal : निवडणुका आणि राजकारणातल्या साजूक मुखवट्या मागचं भयाण वास्तव दाखवणाऱ्या 'इर्सल' (Irsal) या मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर मोठ्या, उत्साहात लॉंच करण्यात आला आहे. 'इर्सल' या सिनेमाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे आणि विश्वास सुतार यांनी केले आहे. ट्रेलर लॉंच झाल्यामुळे हा सिनेमा राजकारणातील कावेबाज माणसांच्या इर्षेची धूळवड दाखवणार असल्याचे दिसून येते.
‘इर्सल’च्या माध्यमातून विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे करणार सिनेसृष्टीत पदार्पण
‘इर्सल’ सिनेमात डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुजाता मोगल, अभिनेत्री माधुरी पवार, शरद जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, सुधीर फडतरे, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, आकाश भिकुले, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत. तर ट्रेलर आणि गाण्यांमधून लक्ष्यवेधून घेणारी विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही फ्रेश जोडी पदार्पण करत आहे.
'इर्सल' या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये राजकारणामधील खालच्या फळीत घडामोडी दिसतात. स्थानिक राजकारण आणि विविध समाजघटकांवर या राजकीय घडामोडींचा होणारा परिणाम यांची झलक यात पहायला मिळते. अगदी टीनएजर्स मुलांपासून राजकारणातील बुजुर्ग नेत्यांपर्यंत निवडणूक काळात नेमकं काय काय घडतं हे या सिनेमात पाहायला मिळणार असल्याचे दिसते.
'इलेक्शन म्हणजे समदा डाकू लोकांचा खेळ असतोय', 'इथला भाय कोणचं नाय', 'नाद केला ना तर बाद करीन' किंवा 'एकदा पाखरू उडालं ना की त्याचा नाद सोडून द्यायचा', तिकीट, पक्ष असल्या कुबड्या बांडगुळांनाचं लागतात' असे संवाद प्रेक्षकांवर छाप सोडतात. त्यामुळे या सिनेमात आणखी काय काय पाहायला मिळेल? याबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुक्ता निर्माण झाली आहे.
3 जूनला सिनेमा होणार प्रदर्शित
'इर्सल' चित्रपटाची कथा अनिकेत बोंद्रे यांची असून पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची आहे. संवाद विश्वास सुतार यांचे तर गीत- संगीत दिनकर शिर्के यांनी दिले आहे. 'इर्सल'चे छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता म्हणून संजय ठुबे यांनी जबाबदारी पार पाडली आहे. तसेच चित्रपटाचे संकलन संतोष गोठोसकर, ध्वनी पियुष शाह, कला सिद्धार्थ तातूसकर, नृत्य धैर्यशील उत्तेकर, वेशभूषा सोनिया लेले - सहस्त्रबुद्धे, रंगभूषा सुहास गवते व महेश बराटे, केशभूषा दीपाली ढावरे यांनी केले आहे. फर्स्ट लुक मुळे चर्चेत आलेला 'इर्सल' येत्या 3 जून 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या