Irsal : 'निशिगंध तुझ्या प्रीतीचा...' पहिल्या गाण्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर 'इर्सल'चं दुसरं गाणं होणार प्रदर्शित
Irsal : 'इर्सल' सिनेमातील 'निशिगंध तुझ्या प्रीतीचा...' हे गाणं सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Irsal : 'इर्सल' (Irsal) सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'इर्सल' सिनेमातील 'या बया दाजी आलं' हे पहिलं गाणं गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्राला वेडं लावणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवारने या गाण्याने तमाम दाजींना घायाळ केलं होतं. आता या सिनेमातील 'निशिगंध तुझ्या प्रीतीचा' हे गाणं प्रदर्शित होणार आहे.
'निशिगंध तुझ्या प्रीतीचा' या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमुळे हे रोमॅंटिक गाणं असेल, याचा अंदाज येत आहे. टीझरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!' अशी 'इर्सल' या सिनेमाची टॅगलाईन आहे. 'इर्सल' या शब्दाचा अर्थ इर्षा असल्यामुळे 'इर्सल' हा मराठी चित्रपट शहरी, निमशहरी किंवा मोठ्या महानगरातील राजकारण आणि गुन्हेगारी विश्वाभोवती फिरणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.
3 जूनला सिनेमा होणार प्रदर्शित
'इर्सल' सिनेमाची कथा अनिकेत बोंद्रे यांची असून पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची आहे. संवाद विश्वास सुतार यांचे तर गीत- संगीत दिनकर शिर्के यांनी दिले आहे. 'इर्सल'चे छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता म्हणून संजय ठुबे यांनी जबाबदारी पार पाडली आहे. तसेच चित्रपटाचे संकलन संतोष गोठोसकर, ध्वनी पियुष शाह, कला सिद्धार्थ तातूसकर, नृत्य धैर्यशील उत्तेकर, वेशभूषा सोनिया लेले - सहस्त्रबुद्धे, रंगभूषा सुहास गवते व महेश बराटे, केशभूषा दीपाली ढावरे यांनी केले आहे. हा सिनेमा 3 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'इर्सल' चित्रपटातून विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही फ्रेश जोडी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. सिनेमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, अभिनेत्री माधुरी पवार यांच्यासह सुजाता मोगल, शरद जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत.
संबंधित बातम्या