INT : 'आयएनटी'चं बिगुल वाजलं; 20 सप्टेंबरला होणार अंतिम फेरी
INT : एकांकिका विश्वातील 'आयएनटी' या मानाच्या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी 20 सप्टेंबरला पार पडणार आहे.
INT : जून महिन्यात कॉलेज सुरू झाल्यानंतर नाट्यवेड्या विद्यार्थ्यांना वेध लागतात ते 'आयएनटी' (INT) या मानाच्या एकांकिका स्पर्धेचे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष एकांकिका स्पर्धा होत नव्हत्या. पण आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा एकदा त्याच जल्लोषात एकांकिका स्पर्धा पार पडणार आहेत. 'आयएनटी' ही एकांकिका विश्वातील अत्यंत मानाची एकांकिका स्पर्धा आहे. या मानाच्या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी येत्या 20 सप्टेंबरला पार पडणार आहे.
कोरोनामुळे अनेक नाट्यवेडे विद्यार्थी कॉलेजमधून पासआऊट झाले. त्यांनी नव्या मार्गाचा अवलंब केला. त्यामुळे सध्या प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना नाटकाची गोडी लावण्यापासून ते त्यांना एकांकिका प्रकार समजावणे, त्यांच्याकडून काम करुन घेणं अशा अनेक गोष्टींचं ओझं सिनिअर्सकडे आहे. अनेक अडचणींचा सामना करत 'आयएनटी'च्या प्राथमिक फेरीत 18 महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे.
राजीव जोशी आणि मुग्धा गोडबोले 'आयएनटी'च्या प्राथमिक फेरीच्या परिक्षणाची धुरा सांभाळत आहेत. तर अंतिम फेरीचे परिक्षक कोण असणार हे अद्याप समोर आलेलं नाही. 20 सप्टेंबरला अनेक आजी-माजी नाट्यवेडे विद्यार्थी यशवंतराव चव्हान सेंटर दणाणून सोडणार आहेत.
आयएनटी दोन वर्षांनी होत असून सर्व नाट्यवेड्या विद्यार्थांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या वर्षी 'आयएनटी' स्पर्धा दोन फेऱ्यांत होत आहे. प्राथमिक फेरी, संहितेचे परिक्षण आणि चर्चा तालीम स्वरुपात होत आहे. तर या फेरीतून पाच एकांकिकांची अंतिम फेरीत निवड होणार आहे, अशी माहिती आयएनटीच्या आयोजिका अवनी मुळ्ये यांनी दिली आहे.
गणपतीची आरती, बालगीतं, आर. यू. आय. ए... रुईया..रुईया, आले आले एमडीचे आले, कीर्ती, कीर्ती, कीर्ती... छान...छान...छान, येऊन येऊन येणार कोण अशा जल्लोषबाजी वातावरणात पुन्हा एकदा आयएनटी ही मानाची एकांकिका स्पर्धा पार पडणार आहे. यंदाच्या आयएनटी स्पर्धेत कोणतं कॉलेज बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या