(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही 2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स
Tamannaah Bhatia : संजय दत्तनंतर आता अभिनेत्री तमन्ना भाटीया हिला देखील महाराष्ट्र सायबर सेलकडून चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे.
Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियाला (Tamannaah Bhatia) महाराष्ट्र सायबर सेलनं चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. तमन्नाला पुढच्या आठवड्यात म्हणजेच 29 तारखेला चौकशीला हजर राहण्यास सांगितलं गेलंय. 2023ची आयपीएल (IPL 2023) स्पर्धा फेअरप्ले अॅपवर प्रसारित केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. यामुळे आपलं 100 कोटींचं नुकसान झालं असा दावा व्हायकॉम 18 या कंपनीनं केला आहे. त्यामुळे आता तमन्नाच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
याच प्रकरणात अभिनेता संजय दत्तची देखील चौकशी करण्यात आली होती. संजय दत्तने मंगळवारी सायबर सेलला त्याचा जबाब नोंदवण्यासाठी आणखी काही वेळ मागितला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्त सध्या काही नियोजित कामानिमित्त मुंबईच्या बाहेर आहे, त्यामुळे मंगळवारी तो चौकशीसाठी उपस्थित राहू शकला नाही. त्यानंतर आता याच प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलकडून अभिनेत्री तमन्ना भाटीया हिला देखील समन्स बजावण्यात आलं आहे.
Tamannaah Bhatia got Summons from Maharashtra Cyber Cell : म्हणून तमन्नाची चौकशी होणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटिया यांनी फेअरप्लेची जाहिरात केली होती. त्यामुळे साक्षीदार म्हणून तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सायबर पोलिसांना भाटियाकडून हे समजून घ्यायचे आहे की फेअर प्लेची जाहिरात करण्यासाठी तिच्याशी कोणी संपर्क केला होता. तिला हे प्रोजेक्ट कसं मिळालं आणि त्यासाठी तिला किती आणि कसे पैसे मिळाले. वायाकॉमने आपल्या तक्रारीत दावा केला होता की फेअरप्लेने टाटा आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) 2023 चे बेकायदेशीरपणे स्क्रीनिंग केले आणि यामुळे त्यांचे 100 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच या प्रकरणी त्यांनी रॅपर बादशाहचा देखील जबाब नोंदवला आहे.
Unauthorised Broadcast of Ipl Matches : वेगवेगळ्या देशाकडून मिळाले पैसे
या प्रकरणाच्या तपासादरम्यान फेअरप्लेने वेगवेगळ्या कंपन्यांच्या खात्यातून कलाकारांना पैसे दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. संजय दत्तला प्ले व्हेंचर नावाच्या कंपनीच्या खात्यातून पैसे मिळाले, ही कंपनी कुराकाओ येथील आहे. बादशाहला लायकोस ग्रुप एफझेडएफ कंपनीच्या खात्यातून पैसे मिळाले, ही कंपनी दुबईत आहे, तर जॅकलिन फर्नांडिसला ट्रिम जनरल ट्रेडिंग एलएलसी नावाच्या कंपनीच्या खात्यातून पैसे मिळाले, ही कंपनी दुबईत आहे.
प्रत्येक महिन्याला पैसे पाकिस्तानात देखील जात होते
फेअरप्ले व्यतिरिक्त, महाराष्ट्र सायबरने याच एफआयआरमध्ये पिकाशो नावाच्या अॅप्लिकेशनचंही नाव आरोपी म्हणून नमूद केलंय. पोलिसांनी या अॅप्लिकेशनची चौकशी केली असता, ॲप्लिकेशनला गुगल ॲडसेन्समधून मिळणारा पैसा पाकिस्तानात जात असल्याचे दिसून आले.
सूत्रांनी दिलेल्या आणि गुगलकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिकाशो नावाच्या ॲप्लिकेशनवर सर्व नवीन चित्रपट आणि वेब सिरीजच्या पायरेटेड कॉपी उपलब्ध आहेत. गुगलच्या माध्यमातून या ॲप्लिकेशनवरील जाहिराती रसीद आणि जुनैद नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहेत खाते आणि हे बँक खाते पाकिस्तानच्या “रहिम यार खान” नावाच्या शहरात असलेल्या एका बँकेत आहे. पोलिसांच्या तपासानुसार, महिन्याला 5 ते 6 कोटी रुपये पाकिस्तानातील आरोपींच्या खात्यात जातात. बेकायदेशीरपणे कमाई आणि पैशाचा वापर या सर्व अर्जांची सायबर पोलिस चौकशी करत आहेत.