एक्स्प्लोर
'तेजाब'मधील अनिल कपूरचा आवाज माझा: सुदेश भोसले

मुंबई: अनिल कपूर यांच्या 'तेजाब' या चित्रपटातील आवाज आपला असल्याचं, गुपित सुप्रसिद्ध गायक आणि मिमिक्री आर्टिस्ट सुदेश भोसले यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. तसेच त्यांनी आपल्या कारकीर्दीतील अनेक चढ-उताराचे क्षणही सांगितले. भोसले म्हणाले की, ''सेन्सॉरसाठी एन. चंद्रा यांना कॉपी पाठवायची होती. पण त्यावेळी अनिल कपूर मुंबईत नव्हते. त्यामुळे चंद्रा यांनी चित्रपटातील अनिल कपूरांचा आवाजातील संवाद माझ्या आवाजात डबिंग करुन घेतले, आणि ती कॉपी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवली. नंतर जेव्हा अनिल कपूर मुंबईत परतले, तेव्हा त्यांच्याच आवाजातूनही चित्रपटाचे पुन्हा डबिंग झाले. पण या दरम्यान जुन्या तयार असलेल्या 25 प्रिंट इतर कॉपींसोबत एकत्रित झाल्या. त्यात पाठवणाऱ्यालाही न समजल्याने माझ्या आवाजातील 25 कॉपी वितरीत झाल्या.'' आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्याविषयी सांगताना भोसले म्हणाले की, ''माझं पेंटिंग ही चांगलं आणि गाणंही चांगलं होतं. त्यामुळे शालेय जीवनात अनेक चित्रपटांचे पोस्टर्स मी केली. वयाच्या 14 व्या वर्षी राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांच्या 'प्रेमनगर' या चित्रपटाचे मी काढलेले पोस्टर्स सर्वत्र झळकले.'' तसेच मिमिक्रीचा सर्वात पहिला प्रयोग महाविद्यालयीन जीवनात केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र 1982 मध्ये मेलेडी मेकर्समधून व्यावसायिक मिमिक्री आर्टिस्ट म्हणून कारकीर्द सुरु केली. याशिवाय संजीव कुमार यांच्या निधनानंतरचे त्यांचे जवळपास 5 चित्रपट आपल्या आवाजात डबिंग केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मिमिक्री आर्टिस्ट म्हणून आपल्या आवाजाची अनेकांना ओळख नसल्याबद्दलची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा























