Sonali Phogat Case : सोनाली फोगाट प्रकरणातील कर्लीज क्लबवर बुलडोझर फिरवणार, गोवा सरकारची मोठी कारवाई!
Sonali Phogat Murder Case : सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्या प्रकरणात गोवा सरकारने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे.
Sonali Phogat Murder Case : सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्या प्रकरणात गोवा सरकारने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी आज (9 सप्टेंबर) सकाळी वादग्रस्त कर्लीज क्लब (Curlis Club) सरकारने जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा क्लब पाडण्यात येत आहे. कर्लीज हा तोच क्लब आहे, जिथे सोनाली फोगाट पार्टी करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. याच क्लबमध्ये सोनाली फोगाट यांना ड्रग्ज देण्यात आले होते, त्यानंतर काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला होता. या क्लबमध्ये ड्रग्जचा पुरवठा देखील होत होता. त्यानंतर गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
उत्तर गोव्यातील या कर्लीज क्लबच्या (Curlis Club) विरोधात यापूर्वीही गोव्यातील विविध अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. या क्लबमध्ये बेकायदेशीर बांधकामाबरोबरच बेकायदेशीर कामांची माहितीही गोवा पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. 2016 मध्ये, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे याचिका दाखल करण्यात आली होत. नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बेकायदेशीर बांधकाम केले गेले असल्याच्या तक्रारी काही स्वयंसेवी संस्थांनी केल्या होत्या. तसेच, समुद्राच्या काठावर बेकायदेशीर बांधकाम करून व्यावसायिक कामे केली जात असल्याचे देखील म्हटले होते.
कर्लीज क्लबची चौकशी
याच क्लबमध्ये आणून सोनाली फोगाट यांना ड्रग्ज देऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. सोनाली फोगाट प्रकरणानंतर गोवा सरकार कडक कारवाई करत आहे. कोस्टल झोनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कर्लीज क्लबची (Curlis Club) चौकशी करण्यात आली. याच प्रकरणात 7 सप्टेंबर 2022 रोजी अंतिम सुनावणीही झाली आणि सीआरझेडच्या नियमांकडे दुर्लक्ष करून केलेले या क्लबचे बेकायदेशीर बांधकाम तोडण्याचे आदेश जारी करण्यात आले.
कर्लीज क्लबवर कारवाईचे आदेश
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्लीज क्लबवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर आज गोव्याचे उपजिल्हाधिकारी बुलडोझर घेऊन पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी पोहोचले असून, सदर क्लबवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यावेळी गोवा कोस्टल झोन अथॉरिटीचे अधिकारी, गोवा महानगरपालिकेचे अधिकारीही उपस्थित आहेत. परवानगीशिवाय हा क्लब बांधण्यात आल्याची तक्रार करणारे अंजुना ग्रामपंचायतीचे 100हून अधिक सदस्य आणि पोलीसही घटनास्थळी आहेत.
गोवा पोलीस करणार संपूर्ण तपास
सोनाली फोगाट प्रकरणात मीडियासोबत संवाद साधताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, कर्लीज रेस्टॉरंट सील करण्यात आले आहे. कर्लीज (Curlis Club) या रेस्टॉरंटमध्येच सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी सोनाली फोगाटला ड्रग्जचा ओव्हरडोज दिला होता.
सोनाली फोगाट हत्याप्रकरणी सीबीआयनं तपास करावा, अशी मागणी सोनाली यांच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे. त्यावर प्रमोद सावंत म्हणाले की, आम्ही हा तपास शेवटपर्यंत करणार आहोत आणि तपास अतिशय प्रोफेशनल पद्धतीने सुरू आहे. तसेच, प्रमोद सावंत यांनी हैदराबाद पोलीस आयुक्तांच्या वक्तव्याला उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, आमच्या डीजीपीने लेखी उत्तर दिले असून हैदराबाद पोलिसांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य मागितले नाही.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: