Shreeram Lagoo Birth Anniversary : शंभरहून अधिक एकांकिका, 150 हून अधिक मराठी-हिंदी सिनेमे; तब्बल दोन दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा 'नटसम्राट'
Shreeram Lagoo : हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि रंगभूषाकार डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती आहे.
Shreeram Lagoo : हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि रंगभूषाकार डॉ. श्रीराम लागू (Shreeram Lagoo) यांची आज जयंती आहे. 16 नोव्हेंबर 1927 रोजी साताऱ्यात त्यांचा जन्म झाला. मराठी रंगभूमीवरचा 'नटसम्राट' असे डॉ. श्रीराम लागू यांना म्हटले जाते. डॉक्टर सिनेमांपेक्षा नाटकातच जास्त रमले.
वयाच्या 42 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण
डॉ. श्रीराम लागू यांना शालेय जीवनापासूनच नाटकाची गोडी लागली. पुण्यात वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परदेशात गेले. सर्जन म्हणून काम करतानादेखील त्यांनी अभिनयाची आवड जोपासली. दोन दशकांहून अधिक काम वैद्यकीय क्षेत्रात काम केल्यानंतर वयाच्या 42 व्या वर्षी ते पूर्णपणे अभिनयक्षेत्राकडे वळाले.
दोन दशके मराठी रंगभूमी गाजवलेले डॉ. श्रीराम लागू
डॉ. श्रीराम लागू यांनी 1969 साली वसंत कानेटकरांच्या 'इथे ओशाळला मारती' या नाटकाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवरील प्रवासाला सुरुवात केली. 'नटसम्राट', 'हिमालयाची सावली', 'गार्बो', 'उद्ध्वस्त धर्मशाळा', 'कस्तुरीमृग', 'एकच प्याला', 'आंधळ्यांची शाळा', 'चंद्र आहे साक्षीला', 'प्रेमाची गोष्ट', 'बहुरुपी', 'लग्नाची बेडी', 'सुंदर मी होणार', 'क्षितिजापर्यंत समुद्र' अशा अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी दोन दशके मराठी रंगभूमी गाजवली. 'नटसम्राट गणपतराव बेलवलकरां'सारखी अनेक पात्रे रंगभूमीवर
डॉ. श्रीराम लागू यांनी 150 हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमांत काम केलं आहे. तसेच शंभराहून अधिक एकांकिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. डॉ. श्रीराम लागू हे एक उत्तम, वाचक, लेखक आणि विचारवंत होते. मनोरंजनसृष्टीत काम करताना ते सामाजिक आणि राजकीय विषयांवरदेखील आपले विचार मांडत असे. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
हिंदी सिनेसृष्टीतही डॉ. श्रीराम लागूंचा दबदबा!
'सिंहासन', 'पिंजरा', 'मुक्ता' अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत डॉ. श्रीराम लागू यांनी काम केलं आहे. 'पिंजरा' सिनेमात त्यांनी आव्हानात्मक भूमिका साकरली. त्यांचा 'सिंहासन' सिनेमातील अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मराठीसह त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही काम केलं आहे. 'सौतन' सिनेमात त्यांनी साकारलेली वडिलांची भूमिका आजही त्यांच्या कसदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहते.
डॉ. श्रीराम यांना फिल्मफेअर पुरस्कार, कालिदास सन्मान, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, राजश्री शाहू कला गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मराठी-हिंदी नाटकांत, सिनेमांत अभियन करण्यासोबत त्यांनी निर्माता आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. तसेच ते उत्तम रसिकदेखील होते.
'देवाला रिटायर करा' या डॉ. श्रीराम लागूंच्या एका विधानाने खळबळ उडाली होती. ते नास्तिक असण्यासोबत विज्ञानवादी आणि समाजवादी होते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजाचे शत्रू आहेत, असं त्यांचं मत होतं. 17 डिसेंबर 2019 रोजी पुण्यात डॉ. श्रीराम लागूंनी अखेरचा श्वास घेतला. आजही ते रसिकांच्या स्मरणात आहेत.
संबंधित बातम्या