(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Santosh Juvekar : संतोष जुवेकरने उघडली अभिनयाचं प्रशिक्षण देणारी शाळा; विद्यार्थ्यांना देणार अभिनयाचे धडे
Santosh Juvekar : अभिनेता संतोष जुवेकरने ठाण्यात अभिनयाचं प्रशिक्षण देणारी शाळा सुरू केली आहे.
Santosh Juvekar : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरचं (Santosh Juvekar) स्वप्न साकार झालं आहे. संताषने ठाण्यात अभिनयाचं प्रशिक्षण देणारी शाळा उघडली आहे. 'ई दृश्यम फिल्म अॅन्ड एंटरटेनमेंट स्कूल' (E-Drishyam film and Entertainment school) असे संतोषच्या नव्या शाळेचे नाव आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संतोषने यासंदर्भात माहिती दिली आहे.
संतोष जुवेकरने एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले आहे, "ठाण्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला -मुलींना ज्यांना अभिनयक्षेत्रात येण्याची इच्छा आहे. त्यांना परवडणारी फी असावी पण सोबतच अभिनयाचं उत्तम शिक्षण मिळावं असा विचार करून अभिनयाचं प्रशिक्षण देणारी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे". या शाळेत संतोष स्वतः विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देणार आहे.
View this post on Instagram
फिल्म स्कूलला सरकारची मदत!
'ई दृश्यम फिल्म अॅन्ड एंटरटेनमेंट स्कूल'मध्ये विद्यार्थ्यांना अभिनयासोबत कमीत कमी पैशात नृत्य, फोटोग्राफी आणि सिने निर्मितीचे प्रशिक्षणदेखील देण्यात येणार आहे. संतोषच्या फिल्म स्कूलला सरकारनेदेखील मदत केली आहे. या शाळेला राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) तसेच मीडिया आणि मनोरंजन कौशल्य परिषद (MESC) यांनी मान्यता दिली आहे.
संतोष जुवेकर मराठीसिनेसृष्टीतील एक उत्तम अभिनेता आहे. त्याने रेगे, मोरया, झेंडा यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. लवकरच 'धारावी बँक' नावाच्या वेबसीरिजमध्ये संतोष दिसणार आहे. सध्या संतोषला चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीदेखील शुभेच्छा देताना दिसत आहेत.