कोणत्याही राजकीय पक्षात सामील होणार नाही : संजय दत्त
संजय दत्तने 2009 मध्ये समाजवादी पक्षाकडून लखनौ येथून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र आता कोणत्याही राजकीय पक्षात सामील होण्याचा विचार नसल्याचे त्याने म्हटलं आहे.
मुंबई : अभिनेता संजय दत्तने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली होती. तसेच संजय दत्त येत्या 25 सप्टेंबरला रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावाही जानकारांनी केला होता.
संजय दत्तने 2009 मध्ये समाजवादी पक्षाकडून लखनौ येथून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र आता कोणत्याही राजकीय पक्षात सामील होण्याचा विचार नसल्याचे त्याने म्हटलं आहे. "मी कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होणार नाही. महादेव जानकर माझे चांगले मित्र आहेत आणि भविष्यातील त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा."
काय म्हणाले होते जानकर?
अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा रासपच्या मुबंईतील महामेळाव्यात घोषणा केली होती.. संजय दत्त यांच्यासारखी माणसं आमच्या पक्षात येत आहेत. सिनेसृष्टीमध्ये देखील आम्ही बांधणी केली आहे, असं जानकरांनी म्हटलं होतं. यावेळी संजय दत्तने देखील व्हिडीओद्वारे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. महादेव जानकर माझे भाऊ आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा, असं संजय दत्तने म्हटलं होतं.