Sandeep Pathak : पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठकचा बोलबाला; ‘राख’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
Sandeep Pathak : सध्या विविध पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक हे नाव चांगलच गाजत आहे.
Sandeep Pathak : विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील चपखलपणे साकारणारे चतुरस्त्र अभिनेते संदीप पाठक (Sandeep Pathak) यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वेगवेगळया धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांना कायमच आनंद दिला आहे. सध्या विविध पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक हे नाव चांगलच गाजत आहे.
जागतिक किर्तीच्या 'काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग 2022' (Couch Film Festival Spring 2022) मध्ये ‘राख’ सिनेमासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवल्यानंतरही त्यांची पुरस्कारांची घोडदौड सुरुच आहे. त्यानंतर नुकत्याच संपन्न झालेल्या ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सव 2022’ मध्येही याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला. तसेच ‘सांस्कृतिक कलादर्पण 2022’ या महोत्सवातही त्यांनी पुरस्कार पटकवत यशाची अनोखी हॅट्रिक साधली आहे.
तीन लोकप्रिय महोत्सवांमध्ये ‘राख’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवत संदीप यांनी यंदा सर्वत्र आपला डंका वाजवला आहे. यासंदर्भात संदीप पाठक म्हणाला,"यंदाचं वर्ष माझ्यासाठी खास आहे. कौतुकाची थाप माझा आनंद व हुरूप वाढवणारी असून माझा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून आमच्या सिनेमाच्या संपूर्ण टीमची ही मेहनत आहे.
संदीप पुढे म्हणाला,"मला भविष्यातही अनेक उत्तम सिनेमे करायचे आहेत. एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांना जे आवडेल ते देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. लवकरच माझे आणखी काही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्यातील विविधांगी भूमिका सुद्धा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील".
मराठमोळ्या संदीप पाठकचा कॅनडामध्ये डंका
चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्यात अग्रस्थानी असणाऱ्या संदीपनं कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या 'काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग 2022' (Couch Film Festival Spring 2022) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. 'राख' या मराठी चित्रपटात संदीपनं साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
... हा आनंद खूप वेगळा!
आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना संदीप म्हणाला की, हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी तो माझा एकट्याचा मुळीच नाही. 'राख' च्या संपूर्ण टिमनं घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. ‘राख’मधील माझं कॅरेक्टर आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं असल्यानं यासाठी पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप वेगळा आहे. या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीला मिळालेली ही जणू पोचपावतीच असल्याचंही संदीप म्हणाला.
संबंधित बातम्या
प्रियदर्शन जाधवचं 25 वं नाटक; ‘हसता हा सवता’ 17 जून रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा