(Source: Poll of Polls)
Monday Motivation : समंथा रुथ प्रभूचा 'या' गंभीर आजारासोबत सामना; पण चेहऱ्यावरचं हसू इतरांसाठी ठरतंय प्रेरणादायी
Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभू दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून एका गंभीर आजाराचा ती सामना करत आहे.
Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) समावेश आहे. समंथाने आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला आहे. पण तरीही तिच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र काही कमी झालेलं नाही. समंथा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता नागा चैतन्यला डेट करत होती. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण नंतर काही कारणाने ते विभक्त झाले.
नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले. पुढे चार वर्षांच्या डेटिंगनंतर ते विभक्त झाले. 2021 मध्ये अभिनेत्रीने याबद्दल घोषणा केली होती. समंथाला आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
समंथाला झालेली 'या' आजाराची लागण
समंथा पतीपासून विभक्त झाल्यानंतर भावनिकरित्या खूप खचली होती. पुन्हा एकदा आपलं काम चोख करण्यावर तिचा भर होता. समंथाला मायोसाइटिस नामक एका आजाराची लागण झाली होती. या आजारात शरीराला सूज येते. मसल्स कमजोर होतात. त्यामुळे शरीरदेखील कमजोर होतं. तसेच त्वचेच्याही समस्यांचा समंथाला त्रास होत होता.
समंथाने हार मारली नाही...
समंथा रूथ प्रभूने एक हेल्थ पॉडकास्ट सुरू केलं. या पॉडकास्टच्या माध्यमातून तिने हेल्थ अपडेट द्यायला सुरुवात केली. त्यावेळी समंथाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पण नागा चैतन्यचं नाव न सांगता अभिनेत्री म्हणाली की, आता तिला खऱ्या अर्थाने श्वास घेता येत आहे. लोकांना गोष्टी कळल्या पाहिजेत जेणेकरुन मी सुरक्षित राहील यामुळेच मला हा पॉडकास्ट बनवायचा होता. लोकांनीदेखील सुरक्षित राहावं".
समंथाचं 'ते' प्रेरणादायी भाषण ऐकलंत का?
समंथाला 2022 मध्ये सत्यभामा विद्यापीठात एक प्रेरणादायी भाषण देण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी अभिनेत्रीने हसत-खेळत तेथील मुलांना आपलंस केलं. सर्वात आधी अभिनेत्री म्हणाली,"तुम्ही जिथे बसला आहात तिथेच काही दिवसांपूर्वी मी बसले होते". या वाक्याच्या माध्यमातून अभिनेत्रीला सांगायचं होतं की,"आज मी यशाच्या शिखरावर पोहोचले आहे म्हणजे उद्या तुम्हीदेखील नक्की पोहोचाल. मी लहान असताना आई-वडिलांनी मला फक्त अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता. शिक्षणात मी काहीतरी चांगलं करेल असं माझ्या आई-वडिलांना वाटत होतं. 10 वी आणि 12 वीमध्ये मी टॉप केलं. तसेच कॉलेजमध्येही मी टॉप केलं".
समंथा पुढे म्हणाली,"पुढील शिक्षणाचा मी विचार केला तेव्हा माझी मदत करण्यासाठी आई-वडिलांकडे ऐवढे पैसे नव्हते. मी काही स्वप्न पाहिलं नव्हतं. भविष्यात काय करायचं याचा मी विचार केला नव्हता. पण तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता. स्वप्न पाहा आणि ते साकार करा. तुम्ही नापास व्हाल, अयशस्वी व्हाल पण प्रवास थांबवू नका. दोन महिने मी फक्त एकवेळचं जेवण करत होते". समंथा रुथ प्रभूच्या हसऱ्या चेहऱ्यामागे तिचा अंगावर शहारे आणणारा प्रवास आहे. तिच्या या कृत्यामुळे, वागण्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी आहे.
संबंधित बातम्या