(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aayush Sharma : सलमानचा मेहुणा आयुष शर्माच्या कारचा अपघात; दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या व्यक्तीची कारला धडक
Aayush Sharma : अभिनेता आयुष शर्माच्या कारचा अपघात झाला आहे. मुंबईतील खार परिसरात ही घटना घडली आहे.
Aayush Sharma : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्माच्या (Aayush Sharma) कारचा अपघात झाला आहे. मुंबईतील खार परिसरात हा अपघात झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीने शर्माच्या कारला धडक दिली आहे.
आयुष कारमध्ये नव्हता
आयुषच्या कारचा अपघात झाला त्यावेळी तो कारमध्ये नव्हता. त्यावेळी कारमध्ये त्यांचा केवळ 31 वर्षीय ड्रायव्हर अरमान मेहंदी हसन खान होता. या अपघातात ते जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कार चालक परविंदरजीत सिंग हा मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
आयुष शर्माचा ड्रायव्हर अरमान मेहंदी हसन खानला अपघातादरम्यान डाव्या पायाला दुखापत झाली आहे. ड्रायव्हरच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 279 आणि 337 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आयुष शर्माबद्दल जाणून घ्या... (Who is Aayush Sharma)
आयुष शर्माने 2018 मध्ये सलमान खानच्या 'लवयात्री' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सलमानच्याच 'अंतिम : द फायनल ट्रूथ' या सिनेमात तो शेवटचा दिसला होता. या सिनेमात तो नकारात्मक भूमिकेत दिसला होता. आयुष लवकरच 'रुसलान' या सिनेमात दिसणार आहे. हा अॅक्शनपॅक्ड सिनेमा आहे. आयुष शर्माचा हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आयुष सलमानची बहिण अर्पिता खानसोबत लग्नबंधनात अडकला आहे. आयुष आणि अर्पिताला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
View this post on Instagram
आयुष शर्मा हा हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आयुषचा जन्म 26 ऑक्टोबर 1990 रोजी हिमाचल प्रदेशात झाला आहे. 'लवयात्री' या सिनेमात आयुष वरीना हुसैनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. आयुषच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीने कारला धडक दिल्याने आयुष शर्मा चर्चेत आला होता. कारचा अपघात झाला त्यावेळी आयुष मात्र कारमध्ये नव्हता.
संबंधित बातम्या