Saif Ali Khan : कबुल है! सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने गुन्हा कबुल केला, कारणही सांगितलं
Saif Ali Khan Attacker : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद शहजाद असून तो मूळचा बांगलादेशचा आहे. सात-आठ महिन्यांपूर्वी तो मुंबईत आल्याचं समोर आलं.
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं हल्ला करणाऱ्या आरोपीने त्याचा गुन्हा कबुल केला. मोहम्मद शहजाद असं त्याचं नाव असून तो बांगलादेशी रहिवासी आहे. मुंबईत नोकरीच्या शोधात आलेल्या मोहम्मद शहजादला 50 हजारांची गरज असल्याने त्याने सैफ अली खानच्या घरी चोरी करण्याचा प्लॅन आखल्याचं मान्य केलं. आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक करायला मुंबई पोलिसांना तीन दिवसांनंतर यश आलं. शनिवारी रात्री 2 वाजता ठाण्यातल्या कासारवडवलीतल्या लेबर कॅम्पमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याला पकडण्यासाठी 100 पेक्षा जास्त पोलिसांची कुमक गेली होती. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी झाडीत लपून बसला होता. अखेर सात तासांच्या सर्च ऑपरेशननंतर आरोपीला पकडण्यात यश आलं.
हल्लेखोर मोहम्मद शहजाद अयाचं वय 30 वर्षे आहे. त्याला 50 हजारांची गरज होती, त्यासाठी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यानं सांगितलं. कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
हल्लेखोर बांगलादेशी, भारतात तीन नावं बदलली
सैफवर हल्ला करणारा मोहम्मद शहजाद हा आरोपी बांगलादेशचा रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं. त्याच्याकडून बांगलादेशचा जन्मदाखला हस्तगत करण्यात आला. सात ते आठ महिन्यांपूर्वी तो सिलीगुडीमार्गे मुंबईत आला होता. बेकायदेशीरपणे भारतात आल्यानंतर त्यानं तीन नावं बदलली. विजय दास असं नाव लावून तो मुंबईत एका हाऊस किपिंग एजन्सीमध्ये काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सैफवर हल्ल्यानंतर त्याचं सीसीटीव्ही फुटेज रिलीज झालं. त्यामुळे घाबरलेला मोहम्मद शहजाद बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता आणि त्यासाठी तो अनेकांच्या संपर्कात होता अशी माहिती समोर आली. मोहम्मद शहजाद याचा बांगलादेशातला पत्ता एबीपी माझाच्या हाती लागला आहे.तो बांगलादेशच्या नाल सिटीतल्या बतायाराज इथला रहिवासी आहे. झलोकाठी जिल्ह्यात त्याचं वास्तव्य होतं.
हल्लेखोर वरळीत वास्तव्यास
हल्लेखोर हा वरळी कोळीवाड्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. वरळीतील प्रजापती नावाच्या व्यक्तीच्या खोलीत तो राहत होता. तर वरळीतल्याच सिल्कवर्क या कॅफेमध्ये तो कामाला होता. वरळीतील कॅफेनंतर तो ठाण्यातील एका हॉटेलमध्ये कामाला लागला. पांडे नावाच्या व्यक्तीने त्याला कामाला लावलं होतं.
सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत तो ठाण्यातल्या हॉटेलमध्ये कामाला होता. ठाण्यातील हॉटेलमध्ये काम करताना त्याने आपली खरी ओळख लपवून विजोय दास असं नाव सांगितलं होतं. आधारकार्डवरही तसंच नाव होतं अशी माहिती हॉटेलच्या मॅनेजरने दिली.
सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर हा वांद्रेहून दादरला आणि त्यानंतर वरळी येथील सिल्कवर्क सिल्कवर्क कॅफेच्या ठिकाणी आला होता. पोलिसांनी या कॅफेतील काही जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांचे मोबाईलही ताब्यात घेतले आहेत.
ही बातमी वाचा: