Rishi Kapoor Birth Anniversary : बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात, ‘बॉबी’मधून जिंकली प्रेक्षकांची मनं! वाचा ऋषी कपूर यांच्याबद्दल...
Rishi Kapoor Birth Anniversary : आज जरी ऋषी कपूर आपल्यात नसले, तरी ते चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात कायम जिवंत राहतील.
Rishi Kapoor Birth Anniversary : दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा जन्म 04 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईत झाला. हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनयाचा वारसा असणाऱ्या प्रसिद्ध कपूर कुटुंबात ऋषी कपूर जन्मले. त्यामुळे मनोरंजनाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. ऋषी कपूर हे बॉलिवूड जगतातील सर्वात लोकप्रिय निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले गेले. त्यांनी या चित्रपटसृष्टीला अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. आज जरी ते आपल्यात नसले, तरी त्यांचे चित्रपट आजही लोकांना आवडतात आणि ते आवर्जून पाहिले जातात. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई आणि अजमेर येथे झाले होते.
अभिनेते ऋषी कपूर यांनी 1970 मध्ये आलेल्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. ‘मेरा नाम जोकर’ हा त्याच्या वडिलांचाच चित्रपट होता. मात्र, ऋषी कपूर यांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली ती 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॉबी' चित्रपटातून, ज्यामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा हा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला आणि या चित्रपटाने त्यांना स्टार बनले. ऋषी यांनीही वडील राज कपूर आणि आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्र करिअर म्हणून निवडले होते.
अवघ्या तिसऱ्या वर्षी बॉलिवूड पदार्पण
आपल्या दीर्घ कारकिर्दीत ऋषी कपूर यांनी अनेक संस्मरणीय भूमिका केल्या. ऋषी कपूर यांच्यामध्ये एक खास गोष्ट अशीही होती की, चॉकलेट बॉय अशी प्रतिमा असूनही ते कोणत्याही प्रकारच्या भूमिकेशी सहजतेने स्वतःला एकरूप करत. ऋषी कपूर यांच्या 'बॉबी' चित्रपटासाठी त्यांचे विशेष कौतुक झाले असले तरी, 'मेरा नाम जोकर' हा त्यांचा पहिला चित्रपट मानला जातो. मात्र, हे फार कमी लोकांना माहित असेल की, ऋषी कपूर (Rishi Kapoor) पहिल्यांदा 1955मध्ये रिलीज झालेल्या 'श्री 420' चित्रपटात पडद्यावर दिसले होते. या चित्रपटात त्याचे वडील राज कपूर आणि अभिनेत्री नर्गिस मुख्य भूमिकेत होते. 'प्यार हुआ इकरार हुआ' या चित्रपटातील एका गाण्यात ऋषी कपूर यांचा कॅमिओ होता. तेव्हा ऋषी कपूर अवघ्या 3 वर्षांचे होते.
चित्रपटांच्या माधमातून नेहमी जिवंत राहतील ऋषी कपूर!
ऋषी यांच्या कारकिर्दीतील आठवणीत राहणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘चांदनी’, ‘नगीना’, ‘सरगम’, ‘नसीब’, ‘एक चादर मैली सी’, ‘कुली’, ‘सागर’, ‘प्रेम रोग’, ‘हिना’, ‘अग्निपथ’, ‘102 नॉट आउट’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘बॉबी’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना 1974 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 2008मध्ये ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अनेक मानाच्या पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते.
हेही वाचा :
Rishi Kapoor : 'क्या तुमने कभी किसी से प्यार किया?'; कलाकारांचे ऋषी कपूर यांना खास ट्रिब्यूट