एक्स्प्लोर
REVIEW : थोडा सांधलेला थोडा लांबलेला... एक निर्णय
इशान आणि मुक्ता दोघेही आपापल्या कुटुंबात रममाण असताना, मुक्ताच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडते आणि एक नवं वादळ तिच्या आयुष्यात येतं. यातून तरुन जाण्यासाठी ती एक निर्णय स्वत:साठी घेते, त्याचे परिणाम कळत नकळत इशानवर कसे होतात त्याची ही गोष्ट आहे.

श्रीरंग देशमुख हे नाव मनोरंजनसृष्टीसाठी नवं नाही. अनेक सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. शिवाय व्हॉइस आर्टिस्ट म्हणूनही ते काम करतात. बरीच वर्षं काम केल्यावर आता त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. 'एक निर्णय.. स्वत:चा स्वत:साठी' असं या सिनेमाचं नाव. याचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्माता या तीनही जबाबदाऱ्या देशमुख यांनीच पेलल्या आहेत. या चित्रपटात विक्रम गोखले, सुहास जोशी, शरद पोंक्षे, मंगल केंकरे, सुबोध भावे, मधुरा वेलणकर, प्रदीप वेलणकर, सीमा देशमुख अशी सगळी मंडळी यात आहेत. शिवाय, या चित्रपटात श्रीरंग देशमुख यांनी छोटी भूमिकाही केली आहे.
या सिनेमाची गोष्ट इशान, मानसी आणि मुक्ता या तीन व्यक्तिरेखांभवती फिरते. इशान पेशाने निष्णात डाॅक्टर आहे. मानसी ही फिजिओथेरपिस्ट असून इशानच्याच हाॅस्पिटलमध्ये ती काम करते. दोघांचं नुकतंच लग्न झालं आहे. आपल्या सुखी संसारात दोघेही आनंदात आहेत. इशानची मैत्रीण आहे मुक्ता. ती डॉक्टर आहेच. पण ती रिसर्चही करते. इशान आणि मुक्ता दोघेही श्रीमंत कुटुंबात वाढले आहेत. आपापल्या कुटुंबात रममाण असताना, मुक्ताच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडते आणि एक नवं वादळ तिच्या आयुष्यात येतं. यातून तरुन जाण्यासाठी ती एक निर्णय स्वत:साठी घेते, त्याचे परिणाम कळत नकळत इशानवर कसे होतात त्याची ही गोष्ट आहे.
उद्भवणाऱ्या प्रसंगांमधून मानवी नातेसंबंध, त्यातली विश्वासार्हता अधोरेखित करणारी ही गोष्ट आहे. याचं कास्टिंग, कलादिग्दर्शन, वेशभूषा आदी गोष्टी नेमक्या असल्या तरी रेंगाळणाऱ्या पटकथेचा मोठा फटका या चित्रपटाला बसतो. प्रसंगात असलेल्या व्यक्तिरेखांना काय म्हणायचं आहे हे कळल्यानंतरही तो प्रसंग सुरु राहिल्याने गोष्ट आश्वासक वेगाने पुढे सरकत नाही. या चित्रपटाची लांबी कमी झाली असती तर कदाचित त्याचा फायदा चित्रपटाला झाला असता. शिवाय अनेक ठिकाणी चित्रपट शब्दबंबाळ झाल्यासारखा वाटतो. मुक्ताचे वडील तिला निर्णय घेण्याबद्दल सांगताना असो किंवा मानसीची ताई तिला लग्न पद्धतीबद्दल बोलताना असो, चित्रपटातली प्रत्येक व्यक्तिरेखा ही आयुष्याबद्दलची आपापली फिलाॅसाॅफी बोलू लागतो तेव्हा हा चित्रपट आणखी लांबत जातो. कारण प्रसंग आणि त्याचं गांभीर्य ठसवण्यात पटकथा यशस्वी झाली असली तरी तो प्रसंग लवकर संपत नाही.
चित्रपटाच्या तांत्रिक अंगांबाबत बोलायचं तर संकलन, छायांकन नेटकं आहे. संगीतामध्ये 'हे बरे' हे गाणं चांगलं झालं आहे. या चित्रपटातून श्रीरंग देशमुख यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आहेच. पण कुंजिका हा नवा चेहरा ही या सिनेमातून आपल्याला दिसेल. मानसीची व्यक्तिरेखा तिने साकारली आहे. तिचा वावर सहज असला, तरी माध्यमात असलेला नवखेपणा त्यात दिसतो. उत्तरार्धात ती काहीशी सेटल झालेली वाटते. याशिवाय सुबोध, मधुरा, विक्रम गोखले आदी मंडळींनी संयमी अभिनय केला आहे.
चित्रपटाची वाढलेली लांबी आणि तात्विक संवाद यामुळे हा चित्रपट काहीसा संथ होतो. ही गती हालती ठेवता आली असती तर चित्रपटावरची पकड अधिक घट्ट झाली असती. पण देशमुख यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या प्रयत्नामुळे त्यांच्याकडून भविष्यात उत्तम सिनेमाची अपेक्षा करायला हरकत नाही. म्हणूनच पिक्चर-बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत अडीच स्टार्स.

आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























