(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Desai Last Rituals : आयुष्याच्या सेटवरुन एक्झिट! नितीन देसाई अनंतात विलीन; एन.डी. स्टुडिओमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nitin Desai : नितीन देसाई यांच्यावर त्यांच्या एन.डी. स्टुडिओमध्ये (ND Studio) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
Nitin Desai Last Rituals : लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं असून आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या एन.डी. स्टुडिओमध्येच (ND Studio) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी यावेळी मानवंदना दिली. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांबरोबरच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
आयुष्याच्या सेटवरुन एक्झिट...
एन.डी स्टुडिओचे निर्माते, लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन देसाई आज पंचत्वात विलीन झाले आहेत. 'मराठी पाऊल पडते पुढे' या कार्यक्रमाच्या सेटवर नितीन देसाईंनी आत्महत्या केली होती. त्यांनी एक चिठ्ठी लिहित आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणालेले,"माझा अंत्यविधी सहा नंबरचा ग्राऊंड आहे, तिथे हॅलिपॅड आहे, त्या ठिकाणी व्हावा". 'जोधा अकबर' (Jodha Akbar) सिनेमाच्या सेटवर नितीन देसाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंच्या पार्थिवावर एन.डी. स्टुडिओंमध्ये अंत्यसंकार पार पडले. नेते आणि अभिनेत्यांनी अंत्यदर्शन घेतलं. दरम्यान मधुर भांडारकर, रवी जाधव, शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी देसाईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. तसेच राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी देखील एन.डी.स्टुडिओमध्ये अंत्यदर्शन घेतलं. मराठी सिने सृष्टीतील सुबोध भावे, मानसी नाईक, निखिल सानेदेखील आले अंत्यदर्शनासाठी आले होते.
नितीन देसाई यांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ आणि बहीण आहे. नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देताना सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीदेखील भावूक झाले.
कोण होते नितीन देसाई? (Who Is Nitin Desai)
नितीन देसाई हे मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय कलादिग्दर्शक, अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक होते. '1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं कला दिग्दर्शन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मंडळींसोबत नितीन देसाई यांचे व्यक्तिगत संबंध होते. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे नितीन देसाई यांनी केले आहेत. त्यांच्या कलाकृतीत कायम प्रेक्षणीय ठरल्या आहेत.
संबंधित बातम्या