Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या फेसबुक पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, जाणून घ्या काय आहे कारण
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये अनेक चुका आहेत.
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता देखील तिने काही फोटो पोस्ट केले आहे. परंतु, या फोटोंसाठी दिलेल्या ओळींवरून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. प्राजक्ताने हे फोटो लंडनमधून शेअर केले आहेत. त्यात तिने भारताची खूप आठवण येत असल्याचे म्हटले आहे. यावरून काहींनी तिचे कौतुक केले आहे. परंतु, काहींनी तिला ट्रोल केलंय.
प्राजक्ता सध्या लंडनमध्ये तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी गेली आहे. तेथून ती आपले नवे अपडेट्स शेअर करत आहे. तिने अलीकडेच शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिला भारताची किती आठवण येत आहे, लंडनमध्ये किती मरगळ आहे यासह अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. प्राजक्ताचे देशप्रेम पाहून काही जणांनी तिचे कौतुक केले आहे. परंतु, तिच्या पोस्टला आलेल्या कमेंट्समध्ये तिला ट्रोल करणाऱ्याच कमेंट्स जास्त आहेत.
चुकाच ठरल्या ट्रोलिंगला कारणीभूत
प्राजक्ताने केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये अनेक चुका आहेत. प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये मातृभुमी ऐवजी 'मातृभी' असा शब्द वापरला आहे. शिवाय लंडनमधील 'थेम्स नदी'ऐवजी 'थेंब्स नदी' असं ती म्हणाली आहे. तिच्या या चुकीच्या शब्दांमुळेच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
आपला देश बरा असं म्हणत लंडनमध्ये तिचं मन कसं रमलं नाही याविषयीची ही पोस्ट केली आहे. तिने भारतावर १५० वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यावरही या पोस्टमध्ये ताशेरे ओढले आहेत. देशप्रेमाविषयी पोस्ट करूनही प्राजक्ताना नेटकऱ्यांची टीका सहन करावी लागली आहे.
प्राजक्ताला ट्रोल करताना नेटकऱ्यांनी म्हटले आहे की, "ब्रिटिशांना शिव्या घालताना तू तिकडे आपला भारतीय पेहराव असलेला जीन्स आणि टी-शर्ट घातला याचा खूप अभिमान वाटतो. एखादी माठ बाई असती तर तिने ब्रिटिशांचा पेहराव असलेली साडी घातली असती. तू जशी बोलते तशी वागते म्हणून प्राजू तुला भारतरत्न द्यायला हवे गं.तू खरोखर महान आहेस, यासह अनेक उपहासात्मक टीकेला प्राजक्ताला समोरं जावं लागलंय.
काय म्हटलंय प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये?
ने मजसी ने परत मातृभीला….
सागरा प्राण तळमळला…
.
भारताची आठवण येतेय असं म्हणणं चुकीचं राहिल.. आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो…
एक क्षण देखील हिंदुस्तान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मूळीच रमलं नाही…
त्याला अनेक कारणं आहेत..,
१- ह्याच ब्रिटीशांनी आपल्याला फसवून १५० वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्यांच्या भूमीत सुख कसं मिळावं?.
२- कोहिनूर परत देण्याचं काही नाव नाही. तो राग वेगळाच.
३- राणी गेल्यानं देश दुखवट्यात, ती मरगळ जाणवली.
४- इथल्या थंडीनं नुसतं गारठून नाही, जखडून गेल्यासारखं झालं.
५- कितीही सुंदर, स्वच्छ असला तरी इथे चैतन्य नाही हे पदोपदी जाणवलं.
६- संस्कृती, खाद्यसंस्कृती, जगण्याविषयीचं तत्वज्ञान अशा अनेक बाबतीत हे लोक विशेष माठ आहेत.. इथे रहात असताना त्याचे पडसाद आपल्यावर पडल्यावाचून राहत नाहीत. आणि ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून आपली संस्कृती, शिक्षणपद्धती, पेहराव इ. गोष्टींवर ही माठगिरी बिंबवली… (आणि वैषम्य असं की आपणही मेंदू न वापरता मोठ्या प्रमाणात ती आंधळेपणानं स्वीकारली. तो अनादर ठळक झाला.)
काही स्वच्छता आणि शिस्तीच्या चांगल्या गोष्टी नक्कीच आहेत. पण क्षेत्रफळ आणि लोकसंख्या ह्यांचं गणित लक्षात घेतलं तर हे जमवणं सहजी शक्य आहे, त्यात काही rocket science नाही. कामासाठी आले नसते तर ४ दिवसात परत धूम ठोकली असती.
.
असो… मुद्दा असा की इतर देश फिरल्यावर पदोपदी जाणवतं की सर्वच अंगांनी माझा प्रिय “भारत” किती महान देश आहे. देवाचे किती आभार मानू की मी भारतात जन्माला आले.
फक्त २ दिवस बाकी.. आलेच…
.
थेंब्स नदीच्या काठावर…