एक्स्प्लोर
Advertisement
'तारा'फेम अभिनेत्रीकडून विनिता नंदा यांना दुजोरा
तारा मालिकेच्या सेटवर चार वर्ष अलोकनाथ आपल्याला त्रास देत होते, असा दावा अभिनेत्री नवनीत निशान यांनी केला आहे
मुंबई : तारा मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नवनीत निशान यांनी लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांना दुजोरा दिला आहे. तारा मालिकेच्या सेटवर चार वर्ष अलोकनाथ आपल्याला त्रास देत होते, असं नवनीत निशान सांगतात. विनिता नंदा यांनी अलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.
'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत नवनीत निशान यांनी आपण अलोकनाथ यांना कानशिलात लगावल्याचा उल्लेख केला आहे. '#MeToo चळवळीअंतर्गत स्वतःसाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला मी पाठिंबा देते. विनिताला झालेल्या वेदना मला समजू शकता. खरं तर त्या कल्पनेच्या पलिकडच्या आहेत. मी चार वर्षांच्या जाचाला कंटाळून त्याला कानफटात लगावली होती.' असं नवनीत निशान म्हणाल्या.
'माझ्या हातून मालिका गेली. त्या माणसाने माझी मीडियामध्ये बदनामी केली. मी माझा लढा दिला. लैंगिक अत्याचाराविरोधात आता आवाज उठवला जात आहे, याचा मला आनंद आहे' असंही त्या म्हणाल्या. नवनीत निशान यांनी कसौटी जिंदगी की, जस्सी जैसी कोई नही यासारख्या मालिकांतून भूमिका केल्या आहेत.
#MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता, पूजा भट्ट, कंगना रनौत यांनी नुकतीच आपली आपबिती मीडियासमोर सांगितली. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर, गायक कैलाश खेर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.
विनिता नंदा यांनी सोमवारी रात्री फेसबुक पोस्ट लिहून आरोप केले आहेत. पोस्टमध्ये त्यांनी अलोकनाथ यांच्या नावाचा उल्लेख केलेला नसला, तरी तसे थेट संकेत त्यांनी दिले आहेत.
'त्याची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड होती. आमचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. मी तारा नावाची मालिका लिहित होते. तो माझ्या मालिकेतील नायिकेच्या मागे होता. तो दारुडा, निर्लज्ज होता, मात्र त्या दशकातील स्टार होता. माझ्या नायिकेला तो सेटवर त्रास द्यायचा, पण सगळे मूग गिळून गप्प होते. तिने आमच्याकडे तक्रार केली तेव्हा आम्ही त्याला काढून टाकायचा निर्णय घेतला. दोघांमध्ये शेवटचा सीन शूट करुन त्याला नारळ दिला जाणार होता, पण त्याला कुणकुण लागली. त्याच दिवशी तो दारु पिऊन सेटवर आला. शॉटला बोलवेपर्यंत तो पित बसला. कॅमेरा रोल होताच तो नायिकेच्या अंगचटीला आला. तिने त्याला कानफटात लगावली. मी सांगितलं, यापुढे तू आमच्या कोणत्याही मालिकेत दिसणार नाहीस. नंतर मित्रांच्या मध्यस्थीमुळे आम्ही पुन्हा बोलायला लागलो' असं विनिता नंदा सांगतात.
'त्या व्यक्तीने (अलोकनाथ) आपल्या घरी आयोजित केलेल्या पार्टीला मी गेले होते. काही मित्रही तिथे होते. माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं आहे, असं मला वाटत होतं. मला जरा वेगळंच जाणवायला लागलं. रात्री दोनच्या सुमारास मी पार्टीतून निघाले, पण कोणीच मला घरी सोडायला येण्याची तयारी दाखवली नाही, हे मला जरा विचित्रच वाटलं. तिथे फार काळ थांबणं मला ठीक वाटत नव्हतं, त्यामुळे घर लांब असूनही मी पायी जाण्याचं ठरवलं' असं विनिता यांनी पुढे लिहिलं आहे.
'अर्ध्या रस्त्यात असताना त्याने (अलोकनाथ) माझ्याजवळ गाडी थांबवली आणि मला घरी सोडण्याचं आश्वासन दिलं. त्याच्यावर विश्वास ठेवून मी गाडीत बसले. त्यानंतर नेमकं काय झालं हे मला अंधुक आठवतंय. पण माझ्यावर दारु उडवली जात होती आणि माझं लैंगिक शोषण केलं जात होतं. मी दुसऱ्या दिवशी झोपेतून उठले, तेव्हा वेदनेची जाणीव झाली. माझ्यावर फक्त बलात्कार झाला नव्हता, तर माझ्याच घरात माझ्यावर भीषण अत्याचाराचा झाले होते' असा दावा विनिता यांनी केला आहे.
विनिता नंदा यांची फेसबुक पोस्ट
विनिता यांच्या आरोपांनंतर 'एबीपी न्यूज'ने अलोकनाथ यांची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न केला. 'त्यांनाच विचारा. मला का विचारता? महिलेने सांगितलं ते ब्रह्मवाक्य असतं ना? मग तेच खरं असेल. माझी बाजू जाणून घेऊन काय कराल? तुम्हाला हवं ते लिहा. मी जे बोलेन त्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? सगळे तिच्यावर (विनिता)च विश्वास ठेवणार. माझ्यावर आरोप तर लागले, मात्र काळासोबत सत्य समोर येईल.' असं अलोकनाथ म्हणाले.
#MeToo ही चांगली चळवळ आहे, पण आपण फक्त महिलांची बाजू ऐकून घेतो, कारण त्यांना कमजोर मानलं जातं, असंही अलोकनाथ म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement