Ameya Khopkar: "हा वाद ताबडतोब थांबायला हवा...."; अमेय खोपकर यांचा रणदीप हुड्डाला इशारा, शेअर केलं ट्वीट
अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच रणदीप हुड्डाला (Randeep Hooda) एक पत्र लिहिलं आहे.
Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच रणदीप हुड्डाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून अमेय खोपकर यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी स्वामित्वहक्कांवरुन सुरु झालेल्या वाद ताबडतोब थांबायला हवा, असा इशारा रणदीपला दिला आहे.
अमेय खोपकर यांनी रणदीप हुड्डाला आणि निर्माते आनंद पंडित यांना पत्र लिहिलं आहे. अमेय खोपकर यांनी या पत्राचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या पत्रामध्ये अमेय खोपकर यांनी लिहिलं, "हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट हिंदी भाषेतून जगभरात प्रदर्शित होणं ही तमाम सावरकरप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लंडनमध्ये म्हणजेच थेट इंग्रजांच्या भूमीत इंग्रजांना आव्हान देऊन स्वातंत्र्यवीरांनी समस्त जगाला अचंबित केलं होतं. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरीही शेवटपर्यंत ते ब्रिटीशांपुढे झुकले नाहीत. भारतमातेला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं अशा स्वातंत्र्यवीरांची धगधगीत गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची मोठी उत्सुकता आहे."
"प्रदर्शनापूर्वी मात्र आता स्वामित्वहक्कांवरुन वाद सुरु झाला आहे, जो अतिशय दुर्दैवी आहे. हा वाद ताबडतोब थांबायला हवा, कारण यामुळे चित्रपट प्रदर्शनाला विलंब झाला तर तो खुद्द स्वातंत्र्यवीरांचा अपमान असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. हा वाद त्वरित मिटवण्यात यावा आणि स्वातंत्र्यवीरांचं कार्य घराघरात पोचावं ही आमची भूमिका आहे. आम्ही दिलेल्या इशाऱ्याचा आपण योग्य आदर राखाल अशी आमची अपेक्षा आहे. "
हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 10, 2023
हिंदी भाषेतून जगभरात प्रदर्शित होणं ही तमाम सावरकरप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लंडनमध्ये म्हणजेच थेट इंग्रजांच्या भूमीत इंग्रजांना आव्हान देऊन स्वातंत्र्यवीरांनी समस्त जगाला अचंबित केलं होतं. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये… pic.twitter.com/X1kg1ysJ8l
रणदीप हुड्डा हा विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. काही दिवसांपूर्वी त्याची महाकाल ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. रणदीपच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. आता रणदीपच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने कमी केले 26 किलो वजन; फॉलो केला 'हा' डाएट प्लॅन